महाबळेश्वर : हॉटेल व्यावसायिकाच्या शाेधार्थ एनडीआरएफ दाखल

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 8 October 2020

दीपक कांदळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. महाबळेश्वर येथील ग्राहक पंचायतीचे ते सक्रिय पदाधिकारी आहेत. त्यांचा वेण्णा लेकमध्ये शाेध लागत नसल्याचे लक्षात येताच प्रशासनाने एनडीआरएफचे पथक बाेलाविले.

महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील वेण्णालेक तलावात बेपत्ता झालेले हॉटेल व्यावसायिक दीपक कांदळकर यांचा अद्याप शोध सुरूच आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स, महाडच्या पट्टीच्या जलतरणपटूंकडून शोधकार्य सुरूच होते. पण त्यात यश न आल्याने पुणे येथील एनडीआरएफचे कमांडर राजेश येवले यांच्यासह 20 जणांचे पथक वेण्णालेक येथे दाखल झाली.

महाबळेश्‍वर नगपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योतीताई कांदळकर यांचे पती, हॉटेल व्यावसायिक दीपक बापूराव कांदळकर (वय 48) साेमवारी रात्रीपासून येथील प्रसिद्ध वेण्णालेक तलावात बेपत्ता झाले आहेत. दीपक हे रोज सायंकाळी भाचा सिद्धार्थ व मित्रांसमवेत फिरण्यासाठी बाहेर जातात. त्यादिवशी ते कार घेऊन बाहेर पडले. वेण्णा लेकपासून एक किलोमीटर अंतरावर लिंगमळा परिसरातील बंगला त्यांनी चालविण्यास घेतला आहे. या ठिकाणाहून ते वेण्णालेक तलाव परिसरात आले होते. त्यांनी बंगल्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सिद्धार्थला घरी सोडण्यास सांगितले. लिंगमळा बंगल्यावरून त्यांचा सहकारी किरण काळे हे सिद्धार्थला घेऊन महाबळेश्वरकडे रवाना झाला. वेण्णालेकच्या वळणावर सिद्धार्थला दीपक यांची गाडी दिसली. गाडीत मागील सिटवर त्यांचे जॅकेट, स्वेटर होते. मात्र, ते तेथे दिसले नाहीत. त्यामुळे किरण व सिद्धार्थ यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, हा मोबाईल वेण्णा तलावावर असलेल्या लोखंडी ब्रिजवर सापडला. दीपक हे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे अनिल केळगने, सुनीलबाबा भाटिया व टीमला कळविण्यात आले.

सायगाव पोलिस पाटील यांचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखाचे सोने दिले परत 

सर्वांनी वेण्णा तलावात शोध मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अंधार व वेण्णा तलावात पाणी जास्त असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत होते. यावेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी, पोलिस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांच्यासह पालिकेचे उपाध्यक्ष अफझल सुतार, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार शिंदे, युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, सुनील शिंदे, दत्तात्रय वाडकर, संजय जंगम, जीवन महाबळेश्वरकर आदी घटनास्थळी उपस्थित होते.

ग्रामीण भागात कोरोना आटोक्‍यात; सातारा जिल्ह्यात 17 मृत्यू

दरम्यान, दूस-या (मंगळवार) दिवशी शोध मोहिमेस पुन्हा सुरुवात झाली. दुपारी महाड, रायगड येथील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्सची टीमही घटनास्थळी दाखल झाली. कांदळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. महाबळेश्वर येथील ग्राहक पंचायतीचे ते सक्रिय पदाधिकारी आहेत. त्यांचा वेण्णा लेकमध्ये शाेध लागत नसल्याचे लक्षात येताच प्रशासनाने एनडीआरएफचे पथक बाेलाविले.

सातारा : राजकारणात साधणार उदयनराजे बेरजेचे गणित

एनडीआरएफच्या सातही प्रशिक्षित डायव्हर्स यांनी तीस ते चाळीस फुटांपर्यंत तळापर्यंत जाऊन शोध घेताहेत. तहसीलदार सुषमा पाटील, माजी नागराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, निवास शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक नासिर मुलाणी आदींनी वेण्णालेक परिसरात भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला. पालिकेचे अधिकारी व कर्मचारीही या शोधकार्यात सक्रिय असून, पालिकेच्या लिटमस मरिन कंपनीच्या अद्ययावत फायबर व रबराच्या दोन रेस्क्‍यू बोटी या शोधकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF Team Reached Venna Lake Mahableshwar Satara News