मांढरदेव दरीतील मृतदेह रत्नागिरीच्या युवकाचा; खूनाचा पत्नीचा दावा

भद्रेश भाटे
Thursday, 31 December 2020

पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे - खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी तपास केला. हवालदार शिवाजी वायदंडे, विजय शिर्के, प्रशांत शिंदे, कृष्णराज पवार यांनी साह्य केले.

वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता. वाई) येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, युवकाचा अज्ञात व्यक्तींनी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथील दरीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. संदीप शांताराम कदम (वय 36, मूळ रा.निगवणी, पो.पालवणी, ता.मंडणगड, जि. रत्नागिरी, हल्ली रा.सिध्दीविनायक बेस्ट कॉलनी, सेक्‍टर 2 मु.मारळगाव, पो.वरद, ता. कल्याण, जि.ठाणे) असे मृत युवकाचे नाव असून, तो ओला कॅबचालक व मालक आहे.
 
वाई-मांढरदेव रस्त्यावर असलेल्या पुलाच्या बाजूस दरीत अज्ञात युवकाचा मृतदेह मंगळवारी ग्रामस्थांना आढळला. याबाबतची खबर पोलिस पाटील जयश्री मांढरे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी सर्वत्र कळविल्यानंतर संदीप कदम यांच्या पत्नी व नातेवाईकांनी वाई येथे येऊन मृतदेह ओळखला. कदम यांची एम.एच.01 सी.जे.0288 या क्रमांकाची गाडी असून, ती ओला कंपनीकडे भाड्याने आहे. 20 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तो कळंबोली ते कोल्हापूर परतीचे भाडे घेऊन गेला होता. 21 डिसेंबर रात्रीपर्यंत त्याचा संपर्क होत होता. परंतु, 22 डिसेंबरपासून नातेवाईकांना त्याचा फोनवर संपर्क होऊ शकला नाही. दोन दिवस मित्र व नातेवाईकांकडे शोध घेऊनही काहीच तपास लागत नसल्याने 24 डिसेंबरला पत्नी संजना हिने कल्याण तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात संदीप बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. दरम्यान, ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी संदीपच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्यासाठी वाईला आले होते. त्यामुळे पुढील तपास गतिमान झाला.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर 

त्यानंतर ता.29 रोजी मांढरदेवच्या हद्दीत युवकाचा सापडलेल्या मृतदेहाबाबत पत्नी संजना कदम यांना कल्याण पोलिसांनी माहिती दिली. यानंतर संजना कदम यांनी दीर व पतीच्या मित्रासोबत वाईला येऊन मृतदेह पाहिला असता तो संदीपचा असल्याचे उघडकीस आले. अज्ञात व्यक्तींनी पतीचे अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मांढरदेव येथील दरीत फेकल्याची तक्रार पत्नी संजना कदम यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरण करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तो कल्याण तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे - खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी तपास केला. हवालदार शिवाजी वायदंडे, विजय शिर्के, प्रशांत शिंदे, कृष्णराज पवार यांनी साह्य केले.

महाबळेश्‍वर, पाचगणीत नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा, हॉटेलिंगचा धिंगाणा नाही चालणार : जिल्हाधिका-यांचा आदेश 

संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ola Cab Driver From Ratnagiri Died At Mandhardevi Ghat Satara Crime News