कऱ्हाडात अवैध पिस्तूलसह पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात

हेमंत पवार
Sunday, 22 November 2020

आटके टप्पा परिसरात बेकायदा पिस्तूल घेऊन एक जण फिरत असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी आटके टप्पा येथे सापळा लावला.

कऱ्हाड (जि. सातारा) :अवैधरीत्या पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. आटके टप्पा-नारायणवाडी येथे काल दुपारी करण्यात आलेल्या कारवाईत संबंधिताकडून पिस्तूल जप्त केले आहे. अभिजित दत्तात्रय विभूते (वय 42, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड) असे संबंधित संशयिताचे नाव असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. 

पोलिसांची माहिती अशी, आटके टप्पा परिसरात बेकायदा पिस्तूल घेऊन एक जण फिरत असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी आटके टप्पा येथे सापळा लावला. त्यादरम्यान संशयित अभिजित विभूते हा त्या परिसरात एका वाईन शॉपसमोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यादरम्यान संबंधित संशयित शॉपसमोरील रस्त्याचे चालत येत असल्याचे त्यांना दिसले. त्यादरम्यान त्यांनी संबंधित संशयिताला ओळखले. त्या वेळी त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केल्यावर जीन्स पॅटमध्ये कमरेजवळ देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळाले.

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा 

त्याच्याकडे परवाना आहे का? असे विचारले असता त्याने नाही असे सांगितले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, संबंधित संशयित हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. संबंधितावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दुचाकीची जाळपोळ अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना हवा होता. पोलिस नाईक अमित पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कड तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In Karad Satara News