पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला; बोरगावनजीक मोटार अपघातात एकाचा मृत्यू

सुनील शेडगे
Tuesday, 22 December 2020

अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोटार क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली.
 

नागठाणे (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) येथे आज (मंगळवार) दुपारी मोटार पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भुजंगराव दामोदर जोशी (वय 74) असे अपघातातील मृताचे नाव आहे. 

जोशी कुटुंबीय हे मोटारीने (एमएच 04 एचएफ 8077) कर्नाटकातील चिकोडी येथून पुण्याला निघाले होते. चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर मोटार महामार्गावरच तीन ते चार वेळा पलटी झाली. त्यानंतर मोटार मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोटार क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली.

पब्लीक सब जानती है; पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम : शशिकांत शिंदे 

या अपघातात नंदाताई भुजंगराव जोशी (वय 62), अनुराधा प्रशांत घुमे (वय 36), श्रीधर प्रशांत घुमे (वय 19), चालक चिन्मय प्रकाश साधले (वय 24) हे जखमी झाले. बोरगाव पोलिस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, क-हाड महामार्ग पोलिस मदतकेंद्राचे रघुनाथ कळके, राजू बागवान, बशीर मुलाणी, 'जनता क्रेन'चे अब्दुल सुतार, सुहेल सुतार यांनी तातडीचे मदत कार्य केले. अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Died From Pune Near Borgaon On Pune Bangalore National Highway Satara News