
Satara News : एक लाख ७७ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ; ६२८.३१ कोटींचे झाले वाटप
सातारा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. आतापर्यंत एक लाख ७७ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून, त्यापोटी ६२८.३१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
अद्यापही आधार प्रमाणिकरण नसल्याने दोन लाख ७२३ शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन उपनिबंधक मनोहर माळी यांनी केले आहे.
वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जात आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील यादीतील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत एक लाख ७७ हजार १६५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६२८ कोटी ३१ लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख पाच हजार २८० खाती नोंदणीकृत झाली आहेत.
त्यापैकी दोन लाख १७ हजार ५४८ खात्यांना सहकार विभागाने विशिष्ट खाती क्रमांक दिली आहेत. यामध्ये दोन लाख १४ हजार ८१६ खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले आहे. दोन हजार ७२३ खात्यांचे आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांनी केल्या आहेत.
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या अनुषंगाने कृषी व्यवसाय फायद्याचा करणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा शासनाच्या धोरणाचा उद्देश आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता.