दीर्घ प्रतीक्षेनंतर कोपर्डे हवेलीत मंदिर उघडले; सिध्दनाथ दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

जयंत पाटील
Monday, 16 November 2020

दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवार) म्हणजे आजपासूनच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आणि आजपासूनच कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सिध्दनाथाच्या मंदिरामध्ये घटस्थापना होऊन उपवास सुरू झाले. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे भाविकांसाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात आज बारा दिवसाचे घट बसवून उत्साहात नवरत्न उपवास आरंभ झाला. सिध्दनाथ जोगेश्वरी नवरत्न (उपवास) निमित्त मंदिरामध्ये धार्मिक विधीबरोबरच देवाला दररोज पोशाखाद्वारे वेगवेगळे रूप दिले जाते. बलिप्रतिपदा, दीपावली पाडव्याला मंदिरामध्ये घटस्थापना करून उपवासाची सुरुवात होते व एकादशीला उपवासाची सांगता केली जाते.
          
दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवार) म्हणजे आजपासूनच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आणि आजपासूनच कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सिध्दनाथाच्या मंदिरामध्ये घटस्थापना होऊन उपवास सुरू झाले. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे भाविकांसाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला. मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. गेल्या सात महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मंदिरे बंद होती. सगळीकडे छोट्या-मोठ्या यात्रा, जत्रा, कार्यक्रम रद्द होत असतानाच दीपावली पाडवा जवळ आल्याने सिध्दनाथ मंदिरात घटस्थापना होणार का? दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले होणार का? असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांसह भाविकांना पडले होते. परंतु, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व चर्चांना विराम देत शासनाने घालून दिलेले नियम पाळून सिध्दनाथ मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली. सकाळी मंदिर उघडण्यापूर्वी लाऊड स्पिकरवरुन ग्रामस्थांनी मंदिरामध्ये येताना मास्क घालून येणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी व मंदिर व्यवस्थापनाने केले होते व तसा प्रतिसादही मिळाला. 

शिवरायांचा तेजस्वी इतिहास जपणारं गड-किल्ल्यांचं गाव अंबवडे बुद्रुक!

घटस्थापनेच्या दिवशीच मंदिर उघडण्यास परवानगी मिळाली. हा चांगला योग जुळून आला आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले झाले आहे, परंतु शासनाने घालून दिलेले नियम पाळूनच भाविकांनी मंदिरामध्ये यावे व सहकार्य करावे. 
-दत्तात्रय गुरव, मंदिराचे पुजारी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opened Shri Siddhanath Temple At Koparde Haveli Satara News