ताल-सुरांच्या निनादात औंधमध्ये रंगणार संगीत महोत्सव; दिग्गज कलाकारांचा सहभाग

फिरोज तांबोळी
Saturday, 21 November 2020

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अनंतबुवा जोशी यांनी गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृरणार्थ औंध (ता. खटाव) येथे 1940 पासून हा उत्सव सुरू केला. पंडित अंतुबुवांचे सुपुत्र पंडित गजाननबुवा जोशी यांनी 1981 मध्ये "शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव या संस्थेमार्फत आयोजित केला जातो.

औंध (जि. सातारा) : डोंबिवली येथील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव या वर्षी उद्या रविवारी (ता. 22) ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाचे यंदा 80 वे वर्ष आहे. 

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अनंतबुवा जोशी यांनी गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृरणार्थ औंध (ता. खटाव) येथे 1940 पासून हा उत्सव सुरू केला. पंडित अंतुबुवांचे सुपुत्र पंडित गजाननबुवा जोशी यांनी 1981 मध्ये "शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव या संस्थेमार्फत आयोजित केला जातो. भारत रत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, गिरिजादेवी, उस्ताद सुलतान खा अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेने हा उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या उत्सवातील सर्व कलाकारांची सादरीकरणे ही "औंध संगीत महोत्सव'च्या फेसबुक पेजवरून, तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून व यु ट्यूबवरून प्रसारित करण्यात येतील. 

मंत्र्यांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी; अक्षयमहाराजांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

उद्या 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना विश्वनाथ शिरोडकर हे तबला साथ करतील. त्यानंतर विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होईल. त्यांना सिद्धेश बिचोलकर हे लेहरा साथ देतील. विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने सत्राची सांगता होईल. त्यांना सौमित्र क्षीरसागर हे संवादिनी साथ करतील, तर पुष्कर महाजन यांची तबला सादर केली. द्वितीय सत्राची सुरुवात संध्याकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना सुयोग कुंडलकर हे संवादिनी साथ करतील, तर चारुदत्त फडके यांची तबला साथ असेल. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांना सुयोग कुंडलकर संवादिनी साथ करतील, तर प्रणव गुरव तबला साथ देतील. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing A Music Festival At Aundh Satara News