
-केराप्पा काळेल
कुकुडवाड : तालुक्यातील शिवारात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे. भर उन्हात ज्वारी काढणीला उत्साह यावा, म्हणून ‘भलं रं भलं गडी दादा भलं’चे सूर उमटू लागले आहेत.
उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली ज्वारी काढणीस सुरुवात झाली आहे. यंदा तालुक्यात परतीच्या पावसाने व वातावरणाने शेतकऱ्यांना दगा दिला. मात्र, तरीही मुबलक पाणी असल्याने ज्वारीची पिके जोमात आली होती. रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी ज्वारी काढायला आल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे.