यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी I Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw Tractor Accident

ग्रामस्थांनी तिथं धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु केली.

Accident : यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी

कऱ्हाड/उंडाळे : येणपे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) गावाजवळील लोहारवाडी परिसरात रिक्षा आणि ट्रॅक्टरचा अपघात (Rickshaw Tractor Accident) होवून एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह एक मुलगी ठार झाली, तर मुलगा जखमी झाल्याची दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पुण्यावरुन यात्रेसाठी पनुंद्रे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) इथं रिक्षानं निघाले असताना हा अपघात झाला. सुरेश सखाराम महारुगडे (वय 39), सु्वर्णा सुरेश महारुगडे (34), समिक्षा सुरेश महारुगडे (13) हे ठार झाले असून समर्थ सुरेश महारुगडे (17) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

कऱ्हाडकडं निघालेल्या ट्रॅक्टरची रिक्षाला धडक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश महारुगडे कुटुंबीय रिक्षानं पुण्याहून गावच्या यात्रेसाठी शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे गावाकडं (Shahuwadi Kolhapur) निघाले होते. त्यादरम्यान त्यांची रिक्षा सकाळी दहाच्या सुमारास येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात आल्यावर रिक्षा आणि कऱ्हाडकडं निघालेल्या ट्रॅक्टरची धडक झाली. त्यामध्ये रिक्षाचा पूर्ण भाग दबला गेला. त्यामुळं रिक्षातील सर्वजण आकडले होते. अपघाताची माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांनी तिथं धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु केली.

रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु

दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अली मुल्ला, हवालदार प्रकाश कारळे, पी. ए. एक्के, बी. बी. राजे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु केली आहे. त्यात आई-वडिलांसह एक मुलगी ठार झाली असून मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.