esakal | आठवडा बाजार गर्दीने फुलला

बोलून बातमी शोधा

Patan
आठवडा बाजार गर्दीने फुलला; पोलिसांना पाहताच पळता भुई थाेडी
sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : शासनाच्या जमावबंदी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत साेमवारी पाटणला आठवडा बाजार फुल्ल भरला. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र संपूर्ण पाटण शहरात होते. अखेर पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना पोलिस फाट्यासह रस्त्यावर उतरावे लागले. या सर्वांनी आठवड्या बाजारात आलेल्यांना अक्षरक्ष: हाकलून लावण्याचे काम करावे लागले.

कोरोनाचा कहर वाढत असताना कोणालाही त्याचे गांभीर्य नाही, हे भयानक चित्र पाटणच्या बाजारपेठेत पहावयास मिळाले. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने धडक मोहीम राबवून मोकाट फिरणाऱ्यांचे जुन्या बस स्थानक परिसरात कोरोना स्वॅब नमुने घेतले. त्या वेळी सर्वांची पळापळ झाली होती. त्याचाही काहीही परिणाम लोकांवर झालेला नाही, हे समोर आले.

सकाळपासून रामापूर ते केरापूल दरम्यान कऱ्हाड- चिपळूण महामार्गावर व भाजीमंडईत व्यापाऱ्यांनी व आसपासच्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची दुकाने थाटली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडालेला दिसला. महामार्ग, भाजीमंडई व पाटणच्या मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. नेहमीप्रमाणे आठवडी बाजार भरला असे चित्र दिसत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी चाफोली रस्त्यापासून पोलिस फौजफाटा घेऊन रस्त्यावर उतरले. व्यापारी व जनतेला संपूर्ण बाजार बंद करा व घरी जा, असे आवाहन करू लागले. काही जणांना पोलिसांनी कायदेशीर बडगा दाखवण्याचा प्रयत्नही केला. चाफोली रस्ता ते केरापूल व भाजीमंडईत अधिकाऱ्यांनी सर्वांना बाजार बंद करण्यास भाग पाडले. अधिकारी रस्त्यावर उतरल्यानंतर सर्वांची पळापळ सुरू झाली.

लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा; गृहराज्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन