शंभरीसाठी फक्त सात पैसेच कमी; साताऱ्यात पेट्रोल दरात 99 रुपये 93 पैशांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Price

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

शंभरीसाठी फक्त सात पैसेच कमी; साताऱ्यात पेट्रोल दरात 99 रुपये 93 पैशांनी वाढ

सातारा : कोरोना व इतर कारणांमुळे महागाईचा आलेख उंचावत असतानाच सातारकरांच्या खिशाला आता पेट्रोलच्या दरामुळे पुन्हा एकदा कात्री लागली आहे. सातारा शहर आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) 99 रुपये 93 पैसे दराने पेट्रोलची विक्री होत असून पेट्रोलच्या दराची शंभरी फक्‍त सात पैशांनी हुकली आहे. (Petrol Price Hiked By 99 Rupees In Satara)

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मालवाहतूक बंद असल्याच्या कारणास्तव सर्वच जीवनाश्‍यक वस्तूंचे दर गेल्या काही दिवसांत वाढले असून दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. इतर वस्तूंच्या वाढलेल्या दराचे चटके सोसत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर शंभरीच्या घराकडे झेपावत होते. कधी 30, तर कधी 50 पैशांच्या घरात उडी मारत पेट्रोलचे दर वाढतच होते. काल-परवापर्यंत 99 रुपये 49 पैशाला असणारे पेट्रोल आज शंभरच्या घराला जावून पोचले आहे. साताऱ्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील मीटरवर पेट्रोलचा दर 99 रुपये 93 पैसे इतका झळकत होता.

हेही वाचा: खतांच्या दरवाढीवर खोतांचा निशाणा; शंभूराज देसाईंचं सदाभाऊंना खुलं आव्हान

नियमित पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर असताना स्पीड पेट्रोलने 102 रुपयांचा, डिझेलने 83 रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार गेल्या काही दिवसांत सातारा शहरासह जिल्हाभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी-जास्त होत आहेत. तरीही अलीकडे वाढलेल्या इंधन दरवाढीने सामान्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहारही बंद आहेत. अशा स्थितीत सर्वांवरच आर्थिक मर्यादा आल्या आहेत. त्यातच इंधनाच्या भरमसाट दरवाढीमुळे वाहन चालवायचे की नाही, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात घोळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा जीवनाश्‍यक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Petrol Price Hiked By 99 Rupees In Satara

loading image
go to top