
फलटण : गुटखाप्रकरणी दोघांना अटक
फलटण शहर : अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३३ हजार ४७१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना वाजेगाव येथे गुटख्याची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वाजेगाव येथील सूरज किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात छापा टाकला असता तेथे दुकानाबाहेरील जिन्याखाली २१ हजार ७९८ रुपयांचा गुटखा मिळून आला. यावरून दुकानदार केशव विठोबा गायकवाड (वय ६०, रा. वाजेगाव, ता. फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडे हा गुटखा आला कुठून याबाबत तपास केला असता हा माल त्यांनी फलटण येथून दोशी या व्यापाऱ्यांकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील सुपर मार्केट परिसरातील व्यापारी संतोष रतनलाल दोशी यांच्या दुकानाची पाहणी केली.
दुकानाशेजारील गोडाऊनमध्ये व दोशी राहात असलेल्या घराखालील गोडाऊनमध्ये एकूण एक लाख ११ हजार ६७३ रुपयांचा गुटखा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांकडील मिळून एकूण एक लाख ३३ हजार ४७१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्यासह सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Web Title: Phaltan Two Arrested Gutkha Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..