esakal | Satara: साताऱ्यात निमोनियाने काढले डोके वर
sakal

बोलून बातमी शोधा

pneumonia

या साथींपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

साताऱ्यात निमोनियाने काढले डोके वर

sakal_logo
By
- प्रवीण जाधव

सातारा: कोरोनाची साथ नियंत्रणात येत असताना व्हायरल संसर्ग व निमोनियाच्या साथीने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. त्यामध्ये मोठ्या व्यक्तींबरोबरच प्रामुख्याने लहान मुलांना जास्त धोका निर्माण होतो आहे. या साथींपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ही लाट लवकर नियंत्रणात आली. परंतु, साताऱ्यात या लाटेच्या संसर्गाचा कालावधी चांगलाच लांबला होता. गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. तरी आजही सुमारे २०० रुग्ण दररोज कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे कोरोना साथीचा धोका पूर्णत: टळलेला नाही. परंतु, रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. कोरोना रुग्णांसाठीचे बेड शिल्लक राहू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत होता. परंतु, निमोनिया व अस्थमा व व्हायरल संसर्गाचे प्रमाण आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरू लागली आहे.

हेही वाचा: इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे

कोरोन संसर्गाच्या भीतीच्या छायेतून नागरिक बाहेर पडत असताना या आजारांनी घरोघरी शिरकाव केलेला आहे. वातावरणातील बदलामुळे हे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वच दवाखाने पुन्हा गर्दीने भरून जाताना दिसत आहेत. जिल्हा रुग्णालयातही बाह्यरुग्ण विभागात या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: लहान मुलांचे प्रमाण त्यामध्ये जास्त आहे. त्यातही रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशा परिस्‍थितीत जास्त मुले आहेत. त्यामुळे दररोज १२ ते १५ मुलांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत या आजारांच्या धोक्याचे गांभीर्य वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. लहान मुलांना बाहेर न पाठविणे, आजारी पडल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे व खाण्यापिण्याच्या वस्तूंबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: "सातारा जिल्ह्यात नवीन 100 बेडचे हॉस्पिटल उभारणार"

‘‘निमोनिया, अस्थमासारखे आजार व व्हायरल इंन्फेक्शनच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आजार बळावू नयेत यासाठी नागरिकांनी वेळीच उपचारांना सुरवात करावी. शक्य असल्यास नागरिकांनी मुलांना फ्लूची लस द्यावी. त्यामुळे अशा आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.’’

- डॉ. अरुंधती कदम, बालरोगतज्‍ज्ञ, जिल्हा रुग्णालय

loading image
go to top