दारूविक्रेत्याच्या मित्रांचा पोलिस पथकावर हल्ला

गिरीश चव्हाण
Saturday, 17 October 2020

ओमप्रकाश हरिदास राठोडला पकडले. त्याच्याजवळून पोलिसांनी देशी दारू व बिअरच्या बाटल्यांसह मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह राठोडला घेऊन पोलिसांचे पथक पुन्हा बोरगावकडे येत होते. त्याच वेळी अपशिंगेच्या एसटी थांब्याजवळ पोलिसांच्या गाडीला तीन दुचाकीस्वारांनी अडवले.

नागठाणे (जि. सातारा) : अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथे अवैध दारूविक्रीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर पाच जणांनी हल्ला केला. त्यात दोन पोलिस जखमी झाले. या प्रकरणी दारूविक्रेत्यासह हल्ला करणाऱ्या चौघांना अटक केली. एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. काल रात्री ही घटना घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश राठोड हा अपशिंगे येथे चोरून दारूविक्री करत होता. याबाबतची माहिती समजल्यावर बोरगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार भीमराव यादव, रामचंद्र फरांदे, हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांचे पथक काल सायंकाळी कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेले. तेथे ओमप्रकाश हरिदास राठोडला पकडले. त्याच्याजवळून पोलिसांनी देशी दारू व बिअरच्या बाटल्यांसह मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह राठोडला घेऊन पोलिसांचे पथक पुन्हा बोरगावकडे येत होते. त्याच वेळी अपशिंगेच्या एसटी थांब्याजवळ पोलिसांच्या गाडीला तीन दुचाकीस्वारांनी अडवले. संकेत राजेंद्र निकम याने "ओमप्रकाश राठोड माझा मित्र आहे. 

तुम्ही त्याच्यावर रेड का टाकली?' असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर लोखंडी गज मारून पोलिस गाडीची काच फोडली. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या नितीन नवनाथ निकम, निरंजन नारायण निकम ऊर्फ बाळा, श्रीकांत विलास निकम, ऋषिकेश शंकर सूर्यवंशी ऊर्फ सोन्या यांनीही पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ओमप्रकाशला सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यांना अडवत असलेल्या प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांना त्यांनी दगडाने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने हल्लेखोरांपैकी नितीन निकम व ओमप्रकाश राठोडला पकडून बोरगाव पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी निकमकडून हल्लेखोरांची नावे निष्पन्न करत त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. या घटनेत संकेत राजेंद्र निकम ऊर्फ बिच्चू हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Four Persons At Apshinge Satara News