
अपघातानंतर वाहन चालक पसार झाला हाेता. लोणंदच्या दिशेने सुसाट वेगाने वाहन निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हाेते
खंडाळा (जि. सातारा) : लोणंद येथील शेळकेवस्ती अपघातातील संशयित मोसिम बालम बागवान (वय 30 रा. माळेवाडी, ता. जि. नगर) यास नुकतेच पोलिसांनी बारामती येथून अटक केली होती. त्याला खंडाळा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे.
लोणंद- खंडाळा रस्त्यावर शेळके वस्तीजवळ घाडगे मळ्यानजीक गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनाने चिरडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनासह चालक बेपत्ता झाला हाेता. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनाची नंबर प्लेट पाेलिसांना मिळाली हाेती, त्यावरून संबंधित वाहनाचा शोध घेतला गेला.
बबन नाना धायगुडे (वय 70), शांताबाई बबन धायगुडे (वय 64) व सारिका भगवान धायगुडे (वय 34) (सर्व रा. शेळकेवस्ती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळ्यानजीक बबन धायगुडे, शांताबाई धायगुडे व सारिका धायगुडे हे तिघे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. घरापासून काही मीटर अंतर खंडाळा बाजूकडे चालत गेल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास अचानकपणे पांढऱ्या रंगाच्या वाहनाने समोरून येत या तिघांनाही जोरदार धडक दिली. या अपघातात बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे हे जागीच ठार झाले, तर त्यांची सून सारिका या गंभीर जखमी झाल्या. पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक पसार झाला हाेता. लोणंदच्या दिशेने सुसाट वेगाने वाहन निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हाेते. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी यांनी संबंधित वाहन चालकास बारामती येथून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे.
गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन
आई... ग... उठ ग! उत्कर्ष, शौर्याच्या आक्रोशाने शेळकेवस्तीचे डोळे पाणावले
Edited By : Siddharth Latkar