सांगलीतील कुटुंबाचा खून करणारा जावळीतील युवक जेरबंद

विजय सपकाळ
Thursday, 3 September 2020

भरतीसाठी कोणाची पैशाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सातारा व जावळी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेढा (जि.सातारा) : सैन्यामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून आर्थिक देवाण- घेवाणीतून सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा खून केलेल्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. योगेश मधुकर निकम (वय 28, रा. शेते फाटा, ता. जावळी) असे त्याचे नाव आहे. त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत शिवाजी जाधव यांनी फिर्याद नोंदविली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, 11 ऑगस्टला दिवदेव मार्ली घाटात एका पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता. त्याचा तपास सुरू असतानाच 29 ऑगस्टला त्याच परिसरात महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेहाजवळ मिळालेल्या एका चिठ्ठीच्या आधारे चौकशी केली. त्या वेळी बामणोली (जि. सांगली) येथील एक पुरुष व महिला बेपत्ता असल्याची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाल्याचे समोर आले. चौकशीत मृतदेह बामणोली येथीलच असल्याचे निष्पन्न झाले. मृत पती- पत्नी असल्याचे सिद्ध झाले. मृतांची दोन मुले ही एक महिन्यापूर्वी मुंबईला भरतीसाठी गेली असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते मुंबईला जातो, असे सांगून गेले ते परत आले नाहीत, अशी माहिती चौकशीत समोर आली. एक व्यक्ती भरतीसाठी मुलांना मदत करणार असून, ती मुले त्याच्याकडे गेली असल्याचे व तो सातारा जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यावर तपासाची चक्रे वेगाने फिरली.

ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी : उदयनराजे
 
पोलिसांनी मुले ज्याच्याकडे गेली होती. त्या योगेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी खाक्‍या दाखवल्यावर त्याने दिवदेव मार्ली घाटात विष घालून, तसेच लोखंडी रॉडने डोक्‍यावर व मानेवर वार करून खून केल्याचे सांगितले. बामणोली गावातील तुषार जाधव व विशाल जाधव दोघा सख्ख्या भावांना मुंबई येथे सैन्यात भरती करतो, असे सांगून लाखो रुपये उकळले होते. नोकरी न लागल्याने त्यांचे मुले व आई वडील वारंवार पैशाची मागणी करू लागले. त्यामुळे तुषार व विशाल या दोघा भावांना मुंबईला भरतीला जायचे सांगून सात जुलै रोजी बोलावून घेतले. त्यानंतर दोन दिवस ट्रेनिंगच्या नावाखाली त्यांना मालदेव घाट इतर ठिकाणी फिरवले.

आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी; दोघांना अटक  

दहा जुलैला पार्टीचा बहाणा करून त्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर दोघांना गंभीर जखमी करून दरीत फेकून दिले. मुलांच्या एक महिन्यात काहीच संपर्क होत नसल्याने ते वारंवार त्यांना भेटण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे त्यांना सात ऑगस्टला बोलावून घेतले. त्यांनाही गाडीने दिवदेव मार्ली घाटात नेले. तेथे त्यांना विषाचे इंजेक्‍शन दिले. त्यानंतर लोखंडी रॉड डोक्‍यात घातला. जमखी झाल्यावर त्यांना दरीत फेकून दिल्याचे योगेशने पोलिसांना सांगितले आहे. 11 ऑगस्ट रोजी तानाजी जाधव (वडील), 29 ऑगस्ट रोजी आई मंदाकिनी जाधव, 31 ऑगस्ट रोजी विशाल, तर आज तुषार जाधव यांच्या मृतदेहाचा सांगाडा घाटातून शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यामध्ये मोठी साखळी असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

ऑक्‍सिजन ग्रुप...कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी, कऱ्हाडला घरोघरी देतात उपचारासाठी मोफत यंत्रे 

फसवणूक झाल्यास संपर्क साधा 

भरतीसाठी कोणाची पैशाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सातारा व जावळी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Youth In Jawali For Beating Family From Sangli