सातारा : पोलिस विभागाचे आता ‘डायल ११२’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip valse patil with SP Ajaykumar Bansal

सातारा : पोलिस विभागाचे आता ‘डायल ११२’

सातारा - कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात पोलिस कॅन्टीन ॲप, डायल ११२ यांसह विविध उपक्रमांना सुरवात करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त रयत मॅनेजिंग कौन्‍सिलचे सदस्य असलेले गृहमंत्री काल (ता. ८) दुपारी साताऱ्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पोलिस मुख्यालयाला भेट दिली. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्यांचे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने स्वागत केले. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांचीही उपस्थिती होती. सुरवातीला गृहमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलिस दलाच्या www.satarapolice.gov.in या नवीन संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावरून नागरिकांना ई-चलन, ऑनलाइन एफआरआय, माहितीचा अधिकार, पोलिस भरती, पोलिस ठाण्यांबाबत व अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती, त्याचबरोबर पोलिस दलाची चांगली कामगिरी तसेच चालू घडामोडींबाबतची माहिती मिळणार आहे. या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी भाषेतून माहिती मिळू शकेल. हे ॲप नागरिकांना हाताळण्यास सुलभ असे बनविण्यात आले आहे.

अडचणीच्या काळात पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ या उपक्रमाचेही गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या क्रमांकावर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर तत्काळ सेवा उपलब्ध होत आहे. जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कमी दरामध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सागरिका कॅन्टीन उभारण्यात आले आहे. या कॅन्टीनच्या ॲपचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्या माध्यमातून पोलिसांना सवलतीच्या दरातील वस्तू ॲपद्वारे बुक करून मागविता येणार आहेत. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांची कमतरता भासत होती. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत अधीक्षक बन्सल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यातून मंजूर झालेल्या निधीतून पोलिस दलाला २० दुचाकी मिळाल्या आहेत. या दुचाकी गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस दलाकडे हस्तांतरण करण्यात आल्या. या वाहनांचा उपयोग निर्भया पथक, महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प व डायल ११२ च्या सुविधेसाठी होणार आहे. या वेळी गृहमंत्र्यांनी पोलिस दलाच्या कामकाजाचा आढावाही घेतला. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक अधीक्षक आंचल दलाल, हिरो कंपनीचे झोनल सेल्स मॅनेजर रोहित देशमुख, सम्राट मोटर्सचे सतीश त्यागी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Police Department Now Has Dial 112

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top