साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण
Saturday, 21 November 2020

साताऱ्यातील जुन्या मंडईत असणाऱ्या एका इमारतीच्या तळमजल्यावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना मिळाली. यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकत  पाच जणांना ताब्यात घेतले.

सातारा : साताऱ्याच्या सदाशिव पेठेतील जुन्या मंडई परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर सुरु असणाऱ्या जुगार अड्यावर काल रात्री शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी त्याठिकाणी जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक करत त्यांच्याकडील रोकड, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

जुन्या मंडईत असणाऱ्या एका इमारतीच्या तळमजल्यावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना काल मिळाली. यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकत हुसेन नबीलाल पठाण (वय 42, रा. सदरबझार), प्रकाश नारायण गायकवाड (वय 52, रा. सोनगाव), तोसिफ सलीम सय्यद (वय 33, रा. गुरुवार पेठ), संतोष शंकर वाघमारे (वय 52, रा. एकता कॉलनी, करंजे), दत्तात्रय वामन जाधव (वय 45, रा. अंबवडे बुद्रुक) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून 1 लाख 80 हजारांची रोकड, जुगाराचे साहित्य असा सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणारा अड्डा उद्ध्वस्त झाल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्‍त करत आहेत. 

बनावट नोटाप्रकरणी नगर जिल्ह्यातून दोघांना अटक; सातारा एलसीबीची कारवाई 

पालिकेच्या जागेत मटका अड्डा 

साताऱ्यातील तांदुळ आळी परिसरात सातारा नगरपालिकेची मोक्‍याची जागा आहे. या जागेत प्लॅस्टिकच्या कागदाचा मंडप टाकत एकाने मटका अड्डा सुरु केला आहे. गेली अनेक दिवस हा अड्डा पोलिस दलातील काही शुक्राचार्यांच्या छुप्या वरदहस्तामुळे बिनबोभाट सुरु आहे. याचठिकाणी अनेक इतर अवैध धंदे सुरु असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. हा अड्डा शाहूपुरी पोलिस कधी उध्दवस्त करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Have Registered A Case Against Five Persons In Satara