क्राईम रेट नियंत्रणासाठी युवक रडारवर; पोलिसांचा 'सोशल इंजिनिअरिंग' फंडा

क्राईम रेट नियंत्रणासाठी युवक रडारवर; पोलिसांचा 'सोशल इंजिनिअरिंग' फंडा

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील क्राईम रेट नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून युवकांना "टार्गेट' करून काम केले जाणार आहे. नवीन पोलिस उपअधीक्षक त्यासाठी स्वतंत्र सोशल इंजिनिअरिंगचा फंडा वापरणार आहेत. शहरासह तालुक्‍यातील गुंडाच्या पद्धतीचा सध्या ते अभ्यास करत आहेत. व्यापक स्वरूपात काम करत कायदा व सुव्यवस्थेसह समाजस्वास्थ्यालाही प्राधान्य देणारे पोलिसींग करण्याचा मनोदय पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

शहरासह तालुक्‍यातील कॉलेज, शाळांत जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गुंडगिरीकडे झुकलेले युवक पोलिसांकडून फोकस केले जाणार आहेत. करिअर सुरू होण्यापूर्वीच गुन्ह्यात सहभागी झालेले युवकांचे नुकसान होऊ नये, हाच महत्त्वाचा उद्देश ठेऊन गुंडगिरीच्या आकर्षणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांच्या कारवायांत लवकरच गती येण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष गुन्ह्यातील सहभागी युवक, त्यांचे नातेवाईक, मित्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पोलिस माहिती घेत आहेत. डॉ. पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष करून गुन्हेगारी नियंत्रणासह युवकांकडे सोशल अँगलने पाहण्याचा प्रयत्न ते करत आहेत. या उपक्रमामुळे गुंडाचे आकर्षण असलेल्यांचा पोलिसांकडूनही अभ्यास होणार आहे. त्याशिवाय गुंडाच्या हालचालींवरही पोलिसांचा वचक राहण्यास हातभार लागणार आहे. 

शहरात महाविद्यालये आहेत. त्याशिवाय मलकापूरसह अनेक ग्रामीण भागात आता महाविद्यालये झाली आहेत, तरीही ग्रामीण भागातून शहरात किमान 20 हजार युवक विद्यानगरात शिक्षण निमित्ताने येतात, त्याचीही माहिती पोलिस घेत आहेत. लॉकडाउनमुळे तो ओघ कमी झाला आहे. मात्र, अनलॉकनंतरच्या स्थितीवर आधीच नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यावर फोकस करण्याचा विचार केला आहे. शहराचा क्राईम रेट वाढतो, त्यात महाविद्यालयीन युवकांमधील क्राईमचा मोठा भाग आहे. त्याचा अभ्यासही पोलिस सध्या करत आहेत. त्याची कारणेही पोलिस शोधणार आहेत. युवकांच्या फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्‌विटरसाख्या सोशल माध्यमांचा अभ्यास करत आहेत. बहुतांशी महाविद्यालयीन युवकांना गुंडगिरीचे फॅड असल्याचे त्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता गुंडांचे फालोअर्स वास्तव स्वीकारून पोलिसाकंडून सोशल इंजिनिअरिंगचाही प्रयत्न होणार आहे. 

अवैध व्यवसायावरही नियंत्रण हवे 

शहरासह तालुक्‍यातील गुंडगिरी, त्यांचे फालोअर्स या सगळ्यांसह डॉ. रणजित पाटील यांना तालुक्‍यातील अवैध व्यवसायावरही नियंत्रण ठेवावे लागणार आहे. शहरासह तालुक्‍यातील विविध भागांत तस्करीने येणारी पिस्तूल, रिव्हॉल्वर यावरही जरब हवी. त्याशिवाय शहरासह तालुक्‍यातील मटका, जुगाराचे अड्डे, पत्त्यांचे क्‍लबसह अवैध दारू व्यवसायही जोरात आहे. ते सारे व्यवसाय बंद हवेत. ते कायमस्वरूपी बंद करता आले नाही, तर त्यावर नियंत्रणाची मात्र 100 टक्के गरज आहे. त्यावरही फोकस करण्याची गरज आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com