कट्टर विराेधक देसाई-पाटणकर गटांचे सूत जुळणार?

जालिंदर सत्रे
Friday, 27 November 2020

सलग 40 वर्षे श्रेयवादाचा व आरोप-प्रत्यारोपात रंगणारा कलगीतुरा महाविकास आघाडी पॅटर्नमुळे वर्षभर बंद असल्याने सर्वांना चुकल्यासारखे वाटत आहे.

पाटण (जि.सातारा) : पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न पाटण येथे निवडणूक प्रचार मेळाव्यात पाहावयास मिळाला. पारंपरिक राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, येणाऱ्या 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न दिसला तर दोन्ही गटांतील संघर्ष कमी होईल, अशी चर्चा तालुक्‍यात रंगू लागली आहे.
 
पाटण तालुका म्हटले, तर गेली 40 वर्षे रंगलेला देसाई-पाटणकर राजकीय संघर्ष दिसतो. देसाई- पाटणकर यांच्यासाठी आर्थिक नुकसान सहन करणारे कार्यकर्ते गावागावांत पाहावयास मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भावाभावांत राजकीय संघर्ष होतो. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तालुका पातळीवरील राजकीय समिकरणेही बदलू लागली आहेत. गेले वर्षभर राजकीय शांतता असणाऱ्या तालुक्‍यात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पाटण येथे झालेल्या मेळाव्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, हिंदुराव पाटील ही आघाडीत सामील व पारंपरिक विरोधक असणारी मंडळी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन हितगुज करताना पाहण्याचा दुर्मिळ योग आला.

पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्र आलेल्या पारंपरिक राजकीय विरोधकांनी आता तालुक्‍यात होऊ घातलेल्या 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक पातळीवर टोकाचा विरोध व संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यात राबविण्यात आलेला पॅटर्न राबविण्याचा कानमंत्र दिला तर गावातील वादविवाद थांबतील, निवडणुकीच्या आखाड्यात होणारा संघर्ष कमी होईल, बिनविरोध निवडी झाल्या तर कार्यकर्त्यांचा वेळ व पैसा वाचेल, वरिष्ठ पातळीवरील राजकारणात काहीही घडू शकते, मग त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये करण्याची जबाबदारी कोणाची?, अशी चर्चा कायकर्ते  रू लागले आहेत.

एलसीबीच्या धडाकेबाज छाप्याने सेटलमेंट उघडकीस; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!

तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न अंमलात आणला गेला तर नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचे व्याप कमी होतील. त्यामुळे पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी एकत्र आलेल्या पारंपरिक राजकीय विरोधकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी पॅटर्न राबविण्याचा आदेश दिला तर प्रशासनाचा भार कमी होईल व महाविकास आघाडी पॅटर्न तळापर्यंत रुजला यावरही शिक्कामोर्तब होईल, अशीही कुजबुज तालुक्‍यात सुरू आहे. 

आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा बंद 

वर्षापूर्वी राज्यात भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. महाआघाडी झाली परंतु; स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांची गोची झाली. तशीच अवस्था सत्तेत नसणाऱ्या नेतृत्वाची झाली आहे. सलग 40 वर्षे श्रेयवादाचा व आरोप-प्रत्यारोपात रंगणारा कलगीतुरा महाविकास आघाडी पॅटर्नमुळे वर्षभर बंद असल्याने सर्वांना चुकल्यासारखे वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Rivals Shambhuraj Desai Vikramsinh Patankar Will Unite For Gram Panchayat Election Satara News