बळीराजाला दिलासा देण्यासाठी देशमुख शिवारात

रुपेश कदम
Monday, 19 October 2020

लावणीसाठी तयार केलेली कांदा रोपे कुजली आहेत. रोपे तयार करण्यासाठी टाकलेले कांदा बी कुजले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिसून न येणारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीची प्रभाकर देशमुख यांनी जातीने पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

दहिवडी (जि. सातारा) : अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख थेट शिवारात पोचले. त्यांनी बोथे, गाडेवाडी, शिंदी खुर्द, देवापूर, वरकुटे मलवडी आदी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, तसेच शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 

परतीच्या पावसाने माणमध्ये धुमाकूळ घातला. या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले. हातची पिके वाया गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. बटाटा, सोयाबीन, बाजरी या पिकांसोबतच कांदा, टोमॅटो यांचे मोठे नुकसान झाले. डाळिंब, द्राक्ष बागा यांची मोठी हानी झाली. या सर्व नुकसानीची पाहणी श्री. देशमुख यांनी केली. बोथे येथे बटाटा व सोयाबीनची मोठी हानी झाली आहे. काढणीला असलेला बटाटा शेतातच नासला आहे, तर लागण केलेला बटाटा कुजून गेला आहे, तसेच सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या असून, त्यांना बुरशी लागली आहे. गाडेवाडी येथील टोमॅटोच्या बागेतील टोमॅटो सडले आहेत, तर झेंडूची झाडे पडल्याने फुलांचे नुकसान झाले आहे. 

कोरोनातही लसीकरणाचे 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण; तासात दहा जणांना लस

कोबीवर मोठ्या प्रमाणात रोग पडला आहे, तसेच देवापुरात द्राक्ष बागांना मोठी झळ पोचली आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा नासला आहे. लावणीसाठी तयार केलेली कांदा रोपे कुजली आहेत. रोपे तयार करण्यासाठी टाकलेले कांदा बी कुजले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिसून न येणारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीची श्री. देशमुख यांनी जातीने पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, रमेश शिंदे, कुमार पोतेकर, गणेश जगदाळे, बाळासाहेब चव्हाण, वैभव खरात, रौनक जगदाळे, गणेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhakar Deshmukh Inspects Crop Damage Due To Rains Satara News