प्रकाश आंबेडकरांच्या 'एक राजा बिनडोक'चा राजेप्रेंमींनी नाेंदविला निषेध

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 8 October 2020

खासदार उदयनराजेंना तमाम मराठा समाज आंदाेलनाचे नेतृत्व करण्यासाठी पाठीमागे लागला आहे. देशातील र्व पक्ष सुद्धा खासदार उदयनराजे आपल्या पक्षात असावेत म्हणून प्रयत्न करीत असतात हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात ठेवावे.

सातारा : मराठा आरक्षणासाठी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठींबा दिला आहे. हा पाठींबा देताना आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. या टीकेचा सातारा जिल्ह्यातील राजेप्रेमींनी  समाजार घेत निषेध नाेंदविला आहे. 

पुण्यात आज (गुरुवार) झालेल्या पत्रकार परिषदेत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेवर टीका करताना, 'संभाजीराजे इतर मुद्द्यांकडे लक्ष वळवत आहेत', असे मत व्यक्त केले. तसेच एक राजा बिनडोक आहे', अशी जहरी टीकाही केली होती. त्यावेळी त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. परंतु, त्यांच्या वक्तव्याचा समाजमाध्यमातून निषेध नाेंदविण्यास प्रारंभ झाला आहे. सातारा आणि काेल्हापूर या दाेन्ही राजघराण्यांना मानणारे देखील आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत नाराज झाले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मराठा आरक्षण संघर्ष समितीने ऍड. आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध केलाय.

प्रकाश आंबेडकरांचे मूळ वक्तव्य वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

साता-यात उदयनराजेप्रेमी एका ठिकाणी एकत्र आले. त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन आंबेडकर यांना साता-यात पाऊल ठेवताच जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान दिले. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत. आज ज्या भाषेत उदयनराजेंबाबत वक्तव्य केले गेले ते चुकीचे आहे. ते शब्द त्यांनाच लागू हाेताे. खरं तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून तुम्ही समाजात पुढे हाेऊन काम करता, वावरता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजांवर केलेली टीका याेग्य नाही. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना साता-यातच नव्हे तर महाराष्ट्रातील उदयनराजेप्रेमी जशास तसे उत्तर देतील असे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गाेसावी यांनीही आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध नाेंदविला. ते म्हणाले, त्यांना काेणत्याही पक्षाने आजपर्यंत खासदारीकी दिली नाही. तुमच्या बुद्धीची आम्हांला कीव करावीशी वाटते. तुम्ही म्हणता वंचितचे नेते आहात मात्र समाजबांधवांना काही दिले नाही. उदयनराजेंनी माझ्यासह संदीप शिंदे, रंजना रावत, सुजाता गाेसावी, विजय बडेकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत माेठी पदे दिली. उदयनराजेंनी कधीही काेण काेणत्या समाजातील आहे हे न पाहता काम केले आहे. काेणत्याही पक्षाचा असाे त्यांनी काम केले आहे. वाचाळवीरांचा बंदाेबस्त आम्ही करु. त्यांनी सातारा शहरात कधी येणार याची माहिती द्यावी. दिनांक आणि वेळ सांगावे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांची दखल घेऊ असा इशारा देखील दिला. यावेळी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे माजी नगराध्यक्षा रंजना रावत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे आदींनी निषेध नाेंदविला.

प्रकाश आंबेडकरांच्या एक राजा बिनडोक विधानावरून वाद; सुरेश पाटील यांच्याकडून निषेध 

सातारा पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विद्यमान पाणी पूरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. आंबेकर यांनी दिलेल्या पत्रकात, प्रकाश आंबेडकर हे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांनी आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भाेसले यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले असून त्यांना हे शाेभत नाही. प्रकाश आंबेडकर यांना डाेके असते तर त्यांना राजकारणात फार माेठे स्थान मिळाले असते. त्यांच्या समाजबांधवांना त्याचा फार माेठा फायदा झाला असता. परंतु दुर्देवाने त्यांना काेणीच विचार नसते.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा पुन्हा उदयनराजेंकडे

याउलट खासदार उदयनराजेंना तमाम मराठा समाज आंदाेलनाचे नेतृत्व करण्यासाठी पाठीमागे लागला आहे. देशातील र्व पक्ष सुद्धा खासदार उदयनराजे आपल्या पक्षात असावेत म्हणून प्रयत्न करीत असतात हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात ठेवावे असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Statement Condemn By Udayanraje Bhosale Followers Satara News