भाजपने पुण्यात मतदान वाढवले असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू : पाटील

प्रवीण जाधव
Saturday, 21 November 2020

महाआघाडातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. 30 ते 40 हजार मतांच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून यायला हरकत नाही. यापूर्वी शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेनेची ताकद कोल्हापूर, पुणे, सातारा व सांगलीतही आहे. ही ताकद आता महाआघाडीसोबत आहे. त्यामुळे उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात मोठा फरक दिसेल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये शेवटच्या काही दिवसांत वाढलेल्या मतदारांची माहिती घेऊन शहानिशा करून आवश्‍यकता असल्यास राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेमुळे आघाडीची ताकद वाढली असून, त्याचे सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसतील, असेही ते म्हणाले. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना पदाधिकारी मेळाव्यासाठी श्री. पाटील हे साताऱ्यात होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ""पदवीधर व शिक्षक दोन्ही मतदारसंघासाठी उत्साहात मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे चांगले मतदान होईल. महाआघाडातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. 30 ते 40 हजार मतांच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून यायला हरकत नाही. यापूर्वी शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेनेची ताकद कोल्हापूर, पुणे, सातारा व सांगलीतही आहे. ही ताकद आता महाआघाडीसोबत आहे. त्यामुळे उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात मोठा फरक दिसेल.'' 

साताऱ्यात 23 नोव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश

भाजपने पुण्यात 56 हजारांचे मतदान वाढवल्याचा आरोप होत आहे, त्यावर बोलताना श्री. पाटील म्हणाले, ""या प्रकरणी आयोगाकडे तक्रार केली नाही; पण आज पुण्यात असताना लोक मतदान वाढवल्याचे वेगवेगळे आकडे सांगत आहेत. 20 हजार मतदार हे चार-पाच दिवसांपूर्वी वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत योग्य माहिती घेऊन आवश्‍यकता वाटल्यास आयोगाकडे तक्रार करू.'' वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी कोणत्या सवलती द्यायच्या, यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या परिस्थितीतून वीज मंडळ बाहेर काढू. ग्राहकांना न्याय द्यायची भावना आहे; पण सरकारवर आर्थिक मर्यादाही आहेत, तरीही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. 

भाजपला धक्का देत 'पवार' पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्‍यात 'पावर' वाढणार!

मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देऊ 

बारामतीचे मेडिकल कॉलेज पूर्ण झाले; पण साताऱ्याच्या मेडिकल कॉलेज काम रखडले आहे, यावर ते म्हणाले, ""आचारसंहिता आहे. मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न सुटला आहे. त्याबाबत आवश्‍यक पावले उचलली आहेत. जलसिंचन विभागाचे कार्यालय आणि वसाहतीत राहणाऱ्या लोकांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल. एकदा काम सुरू झाले, की बारामती मेडिकल कॉलेजपेक्षा अधिक चांगले होईल. या कॉलेजचे डिझाईन चांगले असेल आचारसंहितेनंतर त्याच्या कामाला गती येईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press Conference Of Water Resources Minister Jayant Patil At Satara