
सातारा : रासायनिक खतांची प्रचंड दरवाढ
बुध : अवकाळी पावसामुळे यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांची सारी मदार रब्बी हंगामावर होती. परंतु, पिके बहरात असतानाच विविध कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत प्रतिबॅग ३५० ते ४५० रुपयांची भाववाढ करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
ऑक्टोबर-नोहेंबर २०२१ मध्ये झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. ही खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून होता. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या पेरणीबरोबरच नगदी पीक म्हणून कांदा पिकाचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पिके बहरात असतानाच रासायनिक खतांचे दर वाढविल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यास भरीस भर गेल्या महिन्यापासून चार-आठ दिवसांनंतर ढगाळ वातावरण तयार होत असून, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधे खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यातच आता खतांच्या किमती वाढल्याने पीक जगवायचे कसे, असा प्रश्र्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिकांच्या गरजेच्या वेळीच विविध कंपन्यांनी रासायनिक खतांच्या पोत्यामागे गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी ३५० ते ४५० रुपयांची दरवाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटले आहे. रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी १०-२६-२६ या खताचा वापर करतात. परंतु, सध्या बाजारात या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
सध्या पोटॅश खत उपलब्धच होत नसून, त्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऊस, कांदा, फळे व भाजीपाला पिकांसाठी हे खत अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या खताची दरवाढ कमी करून ती मूळ किमतीपर्यंत खाली आणावी, अशी मागणी खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांधून होत आहे. सध्या फक्त युरिया व डीएपी खतांचे दर शासनाने स्थिर ठेवले असून, इतर रासायनिक खतांच्या किमतीत मात्र भरमसाट वाढ केली आहे. खतांच्या दरवाढीचा परिणाम कांदा, ऊस व रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर होणार असून, रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
रासायनिक खतांची दरवाढ...
खत प्रकार मागील वर्षीचा दर यावर्षीची दर (रुपये)
१०-२६-२६ ११५० १६४०
१९-१९-० १०८० १५७५
एमओपी ८०० १९५०
१२-३२-१६ ११३० १६९०
२०-२०-० ८७० १२५०
१५-१५-१५ ८४० १३५०
कोरोनातील लॅाकडाउनमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना आता खतांच्या किमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीने शेती अर्थव्यवस्था कोलमडून पडली असून, शेतकरी हतबल झाला आहे.
-शाम कर्णे, फळबाग शेतकरी, डिस्कळ
शेतकरी पिकांच्या वाढीसाठी नियोजन करत असतो. मागच्या वर्षापेक्षा यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पन्नावर होणार आहे.
-दीपक घनवट, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर
Web Title: Price Increase Of Chemical Fertilizers Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..