
संघ पुन्हा, की समितीकडून परिवर्तन?
सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिक्षकांच्या दोन संघटना बॅंकेची सत्ता मिळविण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. शिक्षक संघातील विविध नेत्यांचे गट एकत्र येऊन सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिक्षक संघाने ‘पुन्हा येणार’चा नारा दिला आहे, तर शिक्षक समितीने यावेळेस बॅंकेत ‘परिवर्तन अटळ’चा नारा दिला आहे. त्यामुळे संघ, समिती एकमेकांविरोधात भिडणार, हे नक्की आहे. शिक्षक बॅंकेची निवडणूक यावेळी संघ व समितीसाठी प्रतिष्ठेची असेल. संघामध्ये असलेले तीन गट पुन्हा नव्या दमाने एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. शिक्षक संघात संभाजीराव थोरात गट, शिवाजीराव पाटील गट व सिद्धेश्वर पुस्तके गट असे गट आहेत.
या निवडणुकीसाठी या तिन्ही गटांतील नेते व सभासद एकत्र आले, तर शिक्षक समितीला ही निवडणूक जाचणार आहे. सिद्धेश्वर पुस्तके यांनाच या तीनही गटांतील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयोग करावा लागणार आहे, तरच संघाची ताकद एकसंध राहणार आहे. संघाच्या वतीने तालुकानिहाय इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. अर्ज माघारीवेळी संघाच्या पॅनेलमधील नेमके उमेदवार कोण? हे निश्चित होईल.
शिक्षक समितीचे सध्याच्या संचालक मंडळात चार संचालक होते. आता समितीने या वेळी बॅंकेची सत्ता ताब्यात घेण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी परिवर्तनाचा नारा दिला आहे. तालुकानिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून शिक्षक बॅंकेत संघाच्या चुकांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. यात बॅंकेचा कमी झालेला नफा हा त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यामुळे त्यांनी या आधीपासूनच वातावरण निर्मिती केली आहे.
शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच पॅनेल असेल. समितीच्या नेत्यांनीही इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच समितीच्या पॅनेलचे उमेदवार कोण? हे समजेल.
तिसऱ्या पर्यायाचे प्रयत्न...
शिक्षक संघ व समितीबाबत नाराजांना एकत्र आणून विविध शिक्षक संघटनांना एकत्र करत गणेश दुबळे यांचा तिसऱ्या पॅनेलचा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे पॅनेल सर्व जागांवर उमेदवार देणार का? याची उत्सुकता आहे, तसे झाले तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
Web Title: Primary Teachers Co Operative Bank Election Between Two Group Teachers Union And Teachers Committee Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..