esakal | ''तुम्ही यात पडू नका, तुम्हाला महागात पडेल''; गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

''तुम्ही यात पडू नका, तुम्हाला महागात पडेल''; गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना धमकी

मंडळाच्या अध्यक्षांवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली असून, अन्यथा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक सर्व मुलींसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

''तुम्ही यात पडू नका, तुम्हाला महागात पडेल''; गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना धमकी

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करून ब्राह्म समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेली गर्ल्स हायस्कूलचे शालेय साहित्य रस्त्यावर काढून शाळेचे काही वर्ग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
 
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने वाई ब्राह्म समाज मंडळ यांच्याकडून रविवार पेठ येथील बांधीव जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. संस्थेचा भाडेकरार अद्याप बाकी आहे. संस्थेमार्फत या जागेत गर्ल्स हायस्कूल चालविले जाते. लॉकडाउननंतर शासनाने 15 तारखेपासून सर्व शाळा, कॉलेज सुरू करण्यात यावेत असे जाहीर केले. दरम्यानच्या काळात वाई पालिकेने ता. 20/1/2021 रोजी इमारत धोकादायक असल्याची नोटीस पाठविली. मात्र, या इमारतीत कोणतेही वर्ग भरत नाहीत. त्यानंतर संस्थेस अशाप्रकारची नोटीस पाठविण्यात आली. त्यासंदर्भात संस्थेशी पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, शाळेच्या इमारतीमध्ये काहीतरी काम सुरू असल्याचे समजल्याने त्याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून गेले असता ब्राह्म समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काही कामगार शाळेच्या इमारतीतील शालेय साहित्य बाहेर काढून इमारतीचा राडारोडा ट्रॅक्‍टरमध्ये भरत असल्याचे दिसले.

मंडळाच्या अध्यक्षांना शाळेचे साहित्य बाहेर का काढताय, असे मुख्याध्यापकांनी विचारले असता तुम्ही यात पडू नका. तुम्हाला महागात पडेल असा दम देऊन तेथून हाकलून लावण्यात आले. शनिवार, रविवार या दोन दिवसांत सुटीचा फायदा घेत शाळेतील शैक्षणिक साहित्य बाहेर काढण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान शाळेचे झाले आहे. याबाबत संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, असे प्रभारी मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मंडळाच्या अध्यक्षांवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली असून, अन्यथा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक सर्व मुलींसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शरद पवारांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण योग्यच : यशवंतराव होळकर

VIDEO : वीज कनेक्‍शन तोडणे थांबवा, अन्यथा आत्महत्येला परवानगी द्या; मेढ्यात ऊर्जामंत्र्यांचा निषेध

कॉंग्रेसच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका : भाजप प्रवक्ते उपाध्ये

शिवेंद्रसिंहराजेंसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एकत्रच : शशीकांत शिंदे

Edited By : Siddharth Latkar

loading image