
विरोधक केवळ द्वेषातून आणि विद्वेगातून आरोप करत आहेत आणि हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे आणि हे पाच वर्षे पूर्ण करेल, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
वाई (जि. सातारा) : पाच वर्षांच्या त्यांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केले आहे. चांगले काम करणारे हे भक्कम सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी रोज उठून बोटे मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ते म्हणाले, ""अर्णब गोस्वामी अथवा कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने सरकारला कोणताही दोष दिलेला नाही. या निकालाचा अभ्यास सुरू आहे, जर काहीही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही. मात्र, अत्यंत महत्त्वाची प्रकरणे सुनावणीला येणे गरजेचे असताना व 35 हजारपेक्षा जास्त महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित असताना न्यायालयाने राजकीयदृष्ट्या सोयीचे खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत; पण हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळच नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही अशी शंका लोकांमध्ये निर्माण होत आहे.''
महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. या सरकारने वर्षभरात चांगलं काम केलं आहे. कोविडवर नियंत्रण चांगल्या प्रकारे आणले आहे. कोविडचे मोठे संकट असताना ही अनेक निर्णय, शेतकरी कर्ज, अवकाळी पाऊस आदी अनेक विषय थांबलेले नाहीत. विरोधक केवळ द्वेषातून आणि विद्वेगातून आरोप करत आहेत आणि हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे आणि हे पाच वर्षे पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले.
त्यावेळी आरक्षणाचा विचार का झाला नाही? उदयनराजे
Edited By : Siddharth Latkar