पाटणमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा; इंटरनेट सेवेसह मोबाईलचाही अडथळा

जालिंदर सत्रे
Thursday, 1 October 2020

ऑनलाइन शिक्षणासाठी अत्यावश्‍यक असणारी इंटरनेट सेवा या विभागात नसल्याने अगोदर शिक्षणाविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामध्ये आता इंटरनेटचा अडथळा येत असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. इंटरनेट सेवेचा दररोज पंचनामा होतो. काही गावात ही सुविधाच नाही तर अल्पभूधारक व मजुरांची संख्या जास्त असणाऱ्या पाटण तालुक्‍यातील पालक आपल्या मुलाला महागडे मोबाईल उपलब्ध करू शकत नाहीत.

पाटण (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्षावर सावट आले आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या इंटरनेट सेवेबरोबर ऍन्ड्रॉईड मोबाईल गोरगरीब विद्यार्थ्यांकडे तालुक्‍यात नसल्याने मोठा अडथळा आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले तरी आपल्या गावाकडे गेलेले अनेक शिक्षक शाळेत हजर नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. 

शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. सुरू होतील याबाबत साशंकता असल्याने राज्यभर ऑनलाइन शिक्षणास शासनाने सुरवात केली आहे. मात्र, पाटण तालुक्‍याचा पश्‍चिम भाग त्यास अपवाद आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अत्यावश्‍यक असणारी इंटरनेट सेवा या विभागात नसल्याने अगोदर शिक्षणाविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामध्ये आता इंटरनेटचा अडथळा येत असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. इंटरनेट सेवेचा दररोज पंचनामा होतो. काही गावात ही सुविधाच नाही तर अल्पभूधारक व मजुरांची संख्या जास्त असणाऱ्या पाटण तालुक्‍यातील पालक आपल्या मुलाला महागडे मोबाईल उपलब्ध करू शकत नाहीत. त्यातच कोरोनामुळे आर्थिक कोंडी झालेली असताना एका घरातील चार-चार विद्यार्थ्यांना पालक मोबाईल खरेदी करू शकत नाहीत. इंटरनेट सेवा व मोबाईल उपलब्ध नसल्याने शेकडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत चार महिने झाले सक्रिय झालेले नाहीत. 

आली रे आली.. आता नागपूरच्या गुंडांची बारी आली!

तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 527 व माध्यमिक विद्यालये 60 च्या आसपास आहेत. जिल्हा परिषदेच्या 527 शाळांपैकी 243 शाळा लोकसहभागातून डिजिटल झाल्या आहेत. टीव्ही, संगणक व प्रोजेक्‍टर या डिजिटल शाळांत उपलब्ध आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगमुळे शाळा उघडल्या जात नसल्यामुळे वापराविना लोकसहभागातून निर्माण झालेली यंत्रणा पडून आहे. 
धक्कादायक माहिती अशी की, लॉकडाउनच्या अटी शिथिल झाल्यानंतर आपल्या गावाकडे गेलेले अनेक शिक्षक तालुक्‍यात गेलेले चार महिने परतले नाहीत. गावाकडेच त्यांनी कोरोनाचा आधार घेऊन क्‍वारंटाइन करून घेतले आहे. काही शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून तीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे ज्या गावात इंटरनेट सुविधा आहे. मात्र, शिक्षकच नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. 

आंबेनळीच्या दरीत पडलेल्या नवी मुंबईतील युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सने वाचविले 
 
शिक्षकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा 
कायम शिक्षणापासून वंचित असलेल्या तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील विद्यार्थ्यांवर कोरोनाने संक्रांत केली असून, इंटरनेट, मोबाईल आदी समस्यांबरोबर आता शिक्षकच नसल्यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. चार महिने मुख्यालयात न आलेल्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Problem Of Online Education In Patan Satara News