पुसेगाव, खटाव, बुधला बटाटा काढणीस वेग; परतीच्या पावसाने कडधान्यांचे नुकसान

राजेंद्र शिंदे
Monday, 28 September 2020

सध्याचा बटाट्याचा दर बाजारात 1900 रुपये चालला आहे. मार्केटमध्ये दर अजून वाढण्याच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी काढल्या काढल्या लगेच बटाटा व्यापाऱ्यांना घालण्याची शक्‍यता नसल्याची माहिती प्रगतशील शेतकरी आबा काटकर यांनी दिली.
 

खटाव (जि. सातारा) : पावसाने विश्रांती दिल्याने परिसरातील हजारो एकरांवर लागवड केलेल्या बटाटा पिकाची काढणी मजुरांच्या साह्याने पारंपरिक पध्दतीने सुरू झाली आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या घेवडा, वाटाणा, बाजरी आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. 

तालुक्‍यात सुगीमुळे बळिराजाची धांदल उडालेली आहे. घेवडा, सोयाबीन, वाटाणा, कांदा, बटाटा आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. घेवड्याच्या सुगीनंतर सोयाबीन व बटाट्याची सुगीचा आरंभ होतो. कालपर्यंत शेतकऱ्यांची घेवडा, उडीद, मूग, चवळी आदी पिकांच्या सुगीनंतर आता शेतकरी बटाटा काढण्यात गर्क झाला आहे. तालुक्‍यात शेतकरी तीन प्रकारच्या वाणांची लागण करत असतो. 1533, एफ सी 3 व खाण्याचा ज्योती या बटाट्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. सध्या 1533 हा 80 दिवसांचा बटाटा काढणीला आला आहे. त्यात परतीच्या पावसाने अक्षरशः नको नको केले आहे. त्यामुळे जमेल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त मजूर वर्ग लावून बटाटा काढून घेण्याच्या कामात शेतकरी गर्क आहे. स्वाभाविकच शिवारे पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. 

पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

तालुक्‍यात सर्वाधिक बटाटा लागवड पुसेगाव, खटाव, बुध, औंध मंडलात केली जाते. पडणाऱ्या पावसावरच येथील शेती व बटाटा पीक अवलंबून आहे. पाच क्विंटलपासून ते 100 क्विंटलपर्यंत बटाटा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत. एकरी सात ते आठ क्विंटलच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. बटाटा पिकासाठी बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी असा एकूण एकरी 55 ते 60 हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. आता बटाटा काढणी सुरू झाली असली तरी मजुरांची टंचाई जाणवत आहे. पावसानेही विश्रांती घेतली पाहिजे. सध्याचा बटाट्याचा दर बाजारात 1900 रुपये चालला आहे. मार्केटमध्ये दर अजून वाढण्याच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी काढल्या काढल्या लगेच बटाटा व्यापाऱ्यांना घालण्याची शक्‍यता नसल्याची माहिती प्रगतशील शेतकरी आबा काटकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production Of Potato Increased In Pusegoan Khatav Budh Satara News