शेंद्रे ते किणी 30 गावे अपघातग्रस्त; 125 लोकांचा मृत्यू, प्राधिकरणाचे दुर्लक्ष

सचिन शिंदे
Wednesday, 4 November 2020

महामार्ग पोलिसांनी वेळोवेळी महामार्गावरील अपघातांचा अभ्यास करून प्राधिकरणाला उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याबाबत लेखी मागणीही केली आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे रघुनाथ कळके, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस, कऱ्हाड यांनी नमूद केले.

कऱ्हाड ः पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रे-पेठ नाका ते किणी टोलनाका यादरम्यान 30 हून अधिक गावे अपघातग्रस्त ठरली आहेत. या पट्टयातील तब्बल 45 पेक्षाही जास्त ठिकाणांची ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद आहे. या टप्प्यात वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत 125 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे, तर अपघातात कायमचे दुखापत झालेल्यांची संख्या 60 वर आहे. या ब्लॅक स्पॉटवर कायमच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महामार्ग पोलिस करत आहेत. त्याकडे महामार्ग विभाग दुर्लक्ष करत आहे.
 
जिल्ह्यातील शेंद्रे-पेठ नाका ते किणी टोलनाक्‍यापर्यंतचा प्रवास धोक्‍याचा ठरत आहे. त्या टप्प्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. महामार्ग पोलिसांचा आराखडाही हायवे ऍथॉरिटी दुर्लक्षित करत असल्याने या पट्ट्यात उपाय राबविले जात नाहीत. महामार्गावरील दुरुस्तीमुळेच सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा स्पष्ट होतो. काम सुरू असताना चुकीचे फलक लावणे, वाहतूक सेवारस्त्यावरून वळविण्याचे निर्देश असतानाही त्याचे पालन न करणे अशी कारणे अपघाताला निमंत्रण देत आहेत.

राजकारणात मोठी घडामोड! कऱ्हाडात कट्टर विरोधक येणार एका व्यासपीठावर

महामार्गावरील पट्ट्यात तब्बल 22 हून अधिक गावांत उड्डाण पूल आहेत. मात्र, तेथेही खबरदारी घेतलेली नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्याचा अंदाज न आल्यानेही तब्बल 22 अपघात झालेत. मोऱ्या स्वच्छ न केल्याने तेथे कचरा अडकून सेवारस्त्यावर पाणी साचत आहे. किणी टोलनाक्‍यापर्यंतच्या पट्ट्यात तब्बल 45 हून अधिक ठिकाणी पाणी साचताना दिसते. मात्र, एकावरही उपाय केलेला नाही. किणी व तासवडे टोलनाक्‍यावर दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्याची सूचना करूनही त्याचे पालन केले जात नाही. पर्यायाने सरासरी दिवसाआड एका दुचाकीचा तेथे अपघात होत आहे. महामार्गाच्या या पट्ट्यात ट्रक, वाहन थांबा नाही. त्यामुळे चालक झोपू शकत नाहीत. पर्यायाने वाहनांचे अपघात होत आहेत. 

अपघातग्रस्त ठिकाणे... 

 • कऱ्हाड तालुका : कोल्हापूर नाका, मलकापूर फाटा, तासवडे टोलनाका, नांदलापूर फाटा, मसूर फाटा, इंदोली फाटा, वहागाव 
 •  
 • वाळवा तालुका : कासेगाव, केदारवाडी फाटा, नेर्ले, पेठ नाका, वाघवाडी फाटा, किणी टोलनाका 
 •  
 • सातारा तालुका : काशीळ, अतित, नागठाणे, शेंद्रे, बोरगाव 

आवश्‍यक उपाययोजना.. 

 • महामार्गाच्या रस्त्याचे दोन्ही बाजूस सोलर ब्लिंकर
 •  
 • साईन बोर्ड, दिशादर्शक फलक
 •  
 • लांब पल्ल्यावर रम्बलर बसवून त्यावर रिफ्लेक्‍टर लावणे
 •  
 • उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस रिफ्लेक्‍टर
 •  
 • रस्त्याची रुंदी, त्याचे वळण स्पष्ट दिसण्याची सोय
 •  
 • जुने व जीर्ण झालेले मार्गदर्शक फलक बदलणे
 •  
 • दिशा, चिन्हांच्या फलकांचा आकार मोठा करणे
 •  
 • महामार्गावरील खड्डे तत्काळ भरून घेणे 

महामार्ग पोलिसांनी वेळोवेळी महामार्गावरील अपघातांचा अभ्यास करून प्राधिकरणाला उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याबाबत लेखी मागणीही केली आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

रघुनाथ कळके, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस, कऱ्हाड

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Bangalore National Highway Shendre To Kagal Needs To Repair Satara News