esakal | पुणे पदवीधरच्या मतदार नोंदणीत साता-याची आघाडी; उमेदवारीत पिछाडी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पदवीधरच्या मतदार नोंदणीत साता-याची आघाडी; उमेदवारीत पिछाडी

सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार यादीत 54 हजार 835 जणांनी नावांची नोंदणी केलेली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज 12 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. 13 नोव्हेंबरला अर्जांची छाननी, 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. 

पुणे पदवीधरच्या मतदार नोंदणीत साता-याची आघाडी; उमेदवारीत पिछाडी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी साताऱ्यातून महाविकास आघाडीतून कोणीही उमेदवार नसला, तरी भाजपकडून शेखर चरेगावकर इच्छुकांच्या यादीत आहेत. अद्याप दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा झाली नाही; पण सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी सर्व पाचही जिल्ह्यांत फिरून सर्वाधिक नोंदणी केली; पण निवडणुकीसाठी उमदेवार देण्यात मात्र, जिल्हा पिछाडीवर राहिला आहे. सध्या जिल्ह्यातून केवळ भाजपकडून चरेगावकर यांचे नाव इच्छुकांत आहे, तर दुसरीकडे "बिगबॉस' फेम अभिजित बिचुकले यांनीही उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
 
पुणे पदवीधर मतदारसंघांवर भाजपचा पगडा आहे; पण राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही यावेळेस नोंदणीत आघाडी घेतली आहे. यामध्ये साताऱ्याचे सारंग पाटील यांचा पुढाकार आहे; पण श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून खासदारकीचे तिकीट मिळाल्यानंतर सारंग पाटील यांनी आपण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून पदवीधरसाठी कोणीही उमेदवार इच्छुकांत नाही.

व्वा रं पठ्ठ्या! स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत युवकाची बटाटा शेतीत विक्रमी कामगिरी

पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून रूपाली पाटील- ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरुण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे, तर भाजपकडून संग्राम देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे यांच्यासह राजेश पांडे, शेखर चरेगावकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून एक नाव अंतिम केले जाणार आहे. याव्यतिरिक्त साताऱ्यातून "बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, सातारा लोकसभा, विधानसभा, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठीही त्यांनी नशिब आजमविले आहे. आता ते साताऱ्यातून पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अभिजित बिचुकले म्हणतात, ""पैसा सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळेच माझा पराभव होत आला आहे; परंतु पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.'' मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी, असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.

संगणक ऑपरेटरांची दिवाळी यंदा कडूच; 775 ऑपरेटर मानधनापासून वंचित!

पुणे पदवीधर निवडणुकीत सर्वपक्षीय चर्चेतील नावे पाहता ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्‍चित आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक एकत्रित लढवण्यात येणार आहे. महाविकास आघाडी, तसेच भाजपच्या उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. येत्या दोन ते चार दिवसांत दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्‍चित होतील. मनसेकडून रूपाली पाटील- ठोंबरे यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. 

सातारा जिल्ह्यातून 54,835 मतदार नोंदणी
 
सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार यादीत 54 हजार 835 जणांनी नावांची नोंदणी केलेली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज 12 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. 13 नोव्हेंबरला अर्जांची छाननी, 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top