

कोरेगाव : धोम धरण व धोम- बलकवडी धरणातील पाणी वाटपाच्या अनुषंगाने धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीशी मार्च महिन्यात मुंबई येथे मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. सातारा सिंचन मंडळाच्या पुढाकाराने कोयनानगर (ता. पाटण) येथे काल झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव नंदकुमार पाटील यांनी धोम आणि कण्हेर धरणांचे पाणी हे कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत २२.५० टीएमसी एवढेच आहे; परंतु अधिकारी कागदावर ३२ टीएमसी पाण्याचे वाटप करून दाखवताना दिसत आहेत.