esakal | महाबळेश्वरात 'वेण्णा' ओव्हरफ्लो; कसणीत तीन तास वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain In Mahabaleshwar

महाबळेश्वर शहर व परिसरात (Heavy Rain In Mahabaleshwar) आज सात ते आठ इंच पावसाची नोंद झाल्याचा अंदाज आहे.

महाबळेश्वरात 'वेण्णा' ओव्हरफ्लो; कसणीत तीन तास वाहतूक ठप्प

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर शहर व परिसरात (Heavy Rain In Mahabaleshwar) आज सात ते आठ इंच पावसाची नोंद झाल्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाने पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती. शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. वेण्णालेक तलाव दर वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘ओव्हरफ्लो’ होतो. मात्र, २०१५ नंतर यंदा जून महिन्यातच वेण्णालेक तलाव तुडुंब भरून वाहू लागला. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाची धुवाधार सुरूच असून, जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळित झाले आहे. या संततधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्ता हा वेण्णा लेकनजीक सुमनराज परिसरात मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला होता. बुधवारी सकाळी व सायंकाळीही धुवाधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. (Rain Update Today Venna Lake At Mahabaleshwar Overflows Due To Heavy Rain)

कसणी मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प

ढेबेवाडी : कसणी (ता. पाटण) गावाजवळच्या ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने कसणीसह अनेक दुर्गम गावांकडील वाहतूक काल सायंकाळी ठप्प झाली होती. ये- जा करणारे पादचारी, वाहनचालक व प्रवासी तीन तास पुलाच्या दुतर्फा अडकून पडले होते. पवारवाडी- कसणी- म्हाइंगडेवाडी रस्ता सातारा- सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सुमारे पंचवीसवर दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांसाठी उपयुक्त आहे. संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. याच मार्गावरील पवारवाडी जवळचा वांग नदीवरील पूल पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळित होत असल्याने अलीकडे अवघ्या ४० दिवसांत नवीन उंच पुलाची तेथे उभारणी करण्यात आली आहे. मात्र, कसणीजवळच्या कमी उंचीच्या पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने मूळ समस्या कायमच राहिली आहे. ओढ्याचे पात्र वाळूने भरून आल्याने थोड्या पावसातही कसणीचा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे.

Kasani Road

Kasani Road

हेही वाचा: 'मोरणा'चे दरवाजे अडीच फुटांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

काल सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याने दुपारी पुलावर पाणी यायला सुरवात झाली. सायंकाळी संपूर्ण पूल पाण्याखाली गेल्याने ये- जा करणारे पादचारी, वाहनचालक व प्रवासी रात्री पुलाच्या दुतर्फा अडकून पडले होते. भात रोप लावणीची कामे करून शेतातून घरी परतणारे शेतकरी, गावाहून मुंबईस निघालेले चाकरमानी, तसेच कामानिमित्ताने अन्य गावांतून कसणी परिसरात आलेले नागरिक आदींचा त्यात समावेश होता. कसणीचे पोलिस पाटील यशवंत पुजारी स्वतः पुलावर थांबून नागरिकांना पुलावरील पाण्यात न उतरण्याबाबत विनंती करत होते, तरीही न जुमानता काही जण जीव धोक्यात घालताना दिसतच होते. यापूर्वी पावसाळ्यात पाण्याखाली गेलेला पूल ओलांडताना अनेक जण वाहून गेल्याच्या घटनाही तेथे घडलेल्या आहेत. पुलावरील स्लॅब पुरात उखडल्याने त्यावर पाणी असताना ये- जा करणे म्हणजे दुर्घटनेला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Rain Update Today Venna Lake At Mahabaleshwar Overflows Due To Heavy Rain

loading image