पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

राजेश सोळसकर 
Friday, 25 September 2020

ग्रामीण भागातील बहुतांश महिला अजूनही पॅड वापरत नाहीत, मग हा कप वापरण्यास त्या तयार होणे फारच अवघड गोष्ट होती. पण, सुरभीने हार मानली नाही. तिने सुरवातीला आपल्या मैत्रिणींमध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरवात केली. "नाही हो' म्हणत त्यांच्यापैकी अनेकींनी ते वापरायला सुरुवात केली. एकमेकींनी आपले अनुभव शेअर केले.

सातारा : कोणत्याही समस्येवर उपाय हा असतोच आणि या विश्‍वात कोणता असा जटिल प्रश्‍न नाही, त्याला उत्तर नसावे. हे जरी खरं असलं, तरी त्या उत्तरापर्यंत पोचण्याचा मार्ग खडतर असतो आणि त्या मार्गावरून जाण्याचा जे प्रयत्न करतात, ते कधीतरी त्या इप्सितापर्यंत पोचतात. साताऱ्यातील सुरभी जाजू ही अशीच एक धडपडी युवती. महिलांना दर महिन्याला सामोरे जावे लागणारी मासिक पाळी अधिक सुसह्य कशी होईल, असा प्रश्‍न तिला कधी काळी पडला आणि आता ती या प्रश्‍नाच्या उत्तरासमीप आली आहे. मेनस्ट्रुअल कप हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे तिने सिद्ध करून दाखवले आहे आणि आता तिने आपली आई सौ. सुनीता जाजू यांच्यासह महिलांमध्ये या कपच्या वापराबाबत जनजागृतीसाठी स्वतःला झोकून दिले आहे.

खरेतर या पृथ्वीतलावावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी मासिक पाळीसंदर्भातल्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्येला एक मुलगी म्हणून सुरभीलाही जावे लागले असणार; पण समस्येसोबत जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा विचार करणाऱ्यांपैकी ती नक्‍कीच नव्हती आणि म्हणून मग मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया एक स्त्री म्हणून आपल्याला चुकणार नसली, तरी पाळीदरम्यान सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या काही प्रमाणात का होईना, पण आपल्याला कमी करता येणार नाहीत का, असा प्रश्‍न सुरभीच्या मनाला पडला आणि तिथूनच तिचा मासिक पाळी आणखी सुसह्य करण्याचा प्रवास सुरू झाला. खरेतर मासिक पाळी हा विषय अद्यापही आपल्याकडे चर्चेच्या "कुजबुज' या प्रकारात मोडणारा आहे. उच्चशिक्षितांमध्ये अलीकडे या विषयावर काहीसा मोकळेपणा आलेला असला, तरी त्याचे प्रमाण फारच नगण्य आहे.

महिलांनो, चला 'फीलींगलेस पिरियड्स'कडे...
 
अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या सुरभीला मात्र याविषयी कसं बोलायचं, हा प्रश्‍न पडला नाही. घरात तसा मोकळेपणा होता. म्हणून मग सुरभीने आधी आपली आई सौ. सुनीता जाजू यांच्याजवळ मासिक पाळी या विषयात अभ्यास करण्याचा निर्धार बोलून दाखवला. आई सुनीता यांनीही तिला केवळ प्रोत्साहनच न देता प्रत्येक टप्प्यावर पुढे मदतच केली. मग सुरभीने मासिक पाळी या विषयावर इंटरनेटवर जेवढे काही आहे, ते वाचून काढण्याचा सपाटा लावला. मिळतील ती पुस्तके वाचून हातावेगळी केली. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांशी तिने चर्चा केली. या सगळ्या प्रवासात तिला मासिक पाळीविषयीची शास्त्रीय माहिती मिळाली, तसेच अनेक अवैज्ञानिक धक्कादायक अपसमजही समजले. मानवी प्रजोत्पादनासाठीची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे शास्त्रीय तत्त्व सुरभीला समजलं, तसंच या नैसर्गिक प्रक्रियेला अपवित्रतेचं लेबल लावून वर्षानुवर्षे स्त्रीची जी अवहेलना करण्यात आली, ते कटूसत्यही सुरभीला उमजलं.

कोरोनाशी दोन हात करून आशा स्वयंसेविका 'सुमन' पुन्हा जनसेवेसाठी सज्ज
 
मासिक पाळीच्या चार दिवसांत बाजूला बसणाऱ्या एकेकाळच्या स्त्रियांपासून ते आज सॅनिटरी नॅपकिन वापरून त्या कठीण दिवसांतही पुरुषांच्या बरोबरीने कोणतेही काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंतचा सगळा प्रवास सुरभीने अभ्यासला. मासिक पाळीसाठी जुन-पुराणं कापड वापरले जाणाऱ्या त्या काळात महिलांच्या आरोग्यावर जे दृष्परिणाम व्हायचे, ते हल्लीच्या सॅनिटरी नॅपकिनमुळे होत नाहीत, हे अर्धसत्यही तिच्या लक्षात आलं. उलट सॅनिटरी नॅपकिनचे त्या जुन्या-पुराण्या कापडांच्या तुलनेत दिसणारे चार-दोन अधिकचे फायदे सांगताना, सॅनिटरी पॅडचे दुष्परिणाम जाणीवपूर्वक झाकून ठेवले जात आहेत, असं सुरभीचं ठाम मत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञही तिच्या या मताला दुजोरा देत आहेत.

Video : पर्यटकांच्या ओढीने पाचगणी पुन्हा बहरले
 
सुरभीच्या या रिसर्च दरम्यानच तिला मेन्स्टुअल कप संदर्भात माहिती मिळाली. काही देशांतील उच्चभ्रू महिलांनी असे कप वापरायला सुरुवात केल्याचे तिच्या निदर्शनास आले. भारतातही हल्ली ते ऑनलाइन उपलब्ध असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यासंदर्भात आणखी अभ्यास केला असता यातील अनेक उत्पादने खात्रीशीर नव्हती. काही कप हे हार्ड होते. मेन्स्टुअल कप हा पर्याय निश्‍चितच चांगला आहे. पण, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत, याची हमी या उत्पादकांकडून मिळू शकत नव्हती. याच दरम्यान, सुरभीला मेडिकल ग्रेड सिलिकॉनबाबत माहिती मिळाली. अशा प्रकारचे सिलिकॉन वैद्यकीय क्षेत्रात आधीपासूनच वापरले जाते. म्हणून मग तिने अशा प्रकारच्या सिलिकॉनपासून मेन्स्ट्रुअल कप आपण स्वत:च उत्पादित करावेत, याची मनाशी खूणगाठ बांधली. तिने हा विचार आई-बाबांना बोलून दाखविला. त्यांनीही तिला सर्व प्रकारचा सपोर्ट करण्याचे मान्य केले आणि सातारा येथेच सुरभीच्या मेन्स्ट्रुअल कपचे उत्पादन सुरू झाले. रस्टिक आर्ट या ब्रॅंडखाली उत्पादन तर सुरू झालं; पण सुरभीपुढे खरे आव्हान आता कुठे उभे राहिले. याचे मार्केटिंग कसे करायचे, हा साताऱ्यासारख्या ठिकाणी मोठा प्रश्‍नच होता.

भरली ओंजळ आपली; सांडणारी समाजाची : शिंदे बंधूंची गरजूंसाठी धाव 
 
ग्रामीण भागातील बहुतांश महिला अजूनही पॅड वापरत नाहीत, मग हा कप वापरण्यास त्या तयार होणे फारच अवघड गोष्ट होती. पण, सुरभीने हार मानली नाही. तिने सुरवातीला आपल्या मैत्रिणींमध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरवात केली. "नाही हो' म्हणत त्यांच्यापैकी अनेकींनी ते वापरायला सुरुवात केली. एकमेकींनी आपले अनुभव शेअर केले. अर्थातच ते अतिशय सकारात्मक अनुभव होते. यानंतर सुरभीने मागे वळून पाहिले नाही. तिने तिचे बाबा हेमंत जाजू यांच्या कंपनीतील महिलांना ते कप वापरायला सांगितले. त्यासाठीचं सगळं मार्गदर्शन त्यांना केलं. हळूहळू कप वापरणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेली. त्यानंतर मात्र सुरभीने मागे वळून पाहिले नाही. ती आता सातत्याने मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासंदर्भात अगदी खेडोपाड्यांपर्यंतच्या महिलांमध्ये जनजागृती करत आहे. तिची जिद्द आणि धडपड पाहून तिच्या आईनेही आता या कामात झोकून दिले आहे, तर बाबा हेमंत जाजू यांनी त्यांच्या कंपनीचा सीएसआर फंड या जनजागृतीच्या कामासाठी मायलेकींच्या हाती सोपवला आहे. यापुढील काळात अधिकाधिक महिलांना मेन्स्ट्रुअल कपचा वापर करायला लावण्याचा ध्यास सुरभीने घेतला आहे. 

""सॅनिटरी नॅपकिनच्या तुलनेत मेन्स्ट्रुअल कप वापरणे महिलांसाठी शारीरिक आणि समाजासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तो वापरायलाही सोपा आहे. यूज अँड थ्रो प्रकारातील नसल्यामुळे त्यासाठी वनटाइम इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजेच "नो रॅश, नो कॅश, नो थ्रॅश' असे हे उत्पादन आहे.'' 
- डॉ. रेश्‍मा राजभोई, गायनॅकॉलॉजिस्ट, सातारा 

""ज्यांनी मेन्स्ट्रुअल कप वापरायला सुरुवात केली आहे, त्या महिला पुन्हा सॅनिटरी नॅपकिन्सकडे वळलेल्या नाहीत. हा कप वापरल्यामुळे तुम्ही अगदी पोहण्यापासून ते सर्व प्रकारची कामे करू शकता.'' 
- सौ. सुनीता जाजू, सातारा 

""मेन्स्ट्रुअल कप हा एकूणच स्त्रियांच्या आरोग्यासाठी पूरक, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आरामदायी, तसेच पर्यावरणाची हानी न करणारा आणि बचत करणारा असा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, आपल्याकडे मासिक पाळीविषयी असलेल्या पवित्र-अपवित्रतेच्या जुन्या रूढ कल्पनांमुळे या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळे हा कप अद्याप सर्वांपर्यंत पोचलेला नाही. यासाठी शाळेतील मुलींपासून ते काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत जागरूकता शिबिरे भरविली पाहिजेत. पाळीविषयीची वैद्यकीय माहिती, कपबद्दलचा प्रसार झाला पाहिजे. सरकारनेही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.'' 

- सुरभी पेंढारकर, सातारा 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Solaskar Article On Surabhi Jaju Research On Menstrual Cup Satara News