राजे.. पोटापाण्यासाठी आलेल्यांची परवड थांबवा

गिरीश चव्हाण
Friday, 9 October 2020

राजवाडा परिसरातच नव्याने झालेल्या वाहनतळावर चौपाटी सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली होती. याठिकाणची जागा चौपाटीसाठी अपुरी असल्याने नंतर त्याबाबतची कार्यवाही रेंगाळली. याच काळात युनियन क्‍लबच्या मागील जागेत चौपाटीचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, त्यावरील कार्यवाहीसुध्दा थंडावली आहे.

सातारा : येथील चौपाटी गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने याठिकाणचे व्यावसायिक आणि कामगारांची उपासमार सुरू झाली आहे. चौपाटी सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने चौपाटी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यावसायिकांची रोजगार साखळी पूर्णपणे तुटलेली असून, त्यातून गंभीर सामाजिक प्रश्‍न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा गंभीर सामाजिक प्रश्‍न सातारा पालिका, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे आहे.

एक-दोन गाड्यांपासून सुरू झालेल्या चौपाटीवर आजमितीला सुमारे 100 हून अधिक गाडे खाद्यसेवा पुरवित आहेत. या गाड्यांचे मालक आणि इतर सेवा पुरविणारे कामगारांचे अर्थव्यवस्थापन यावरच अवलंबून आहे. याठिकाणी असणाऱ्या गाड्यांना आवश्‍यक ते साहित्य, भाजीपाला पुरविण्याचे काम सुध्दा अनेक जण दररोज करत असतात. या सर्वांची दिवसाची एकत्रित उलाढाल सुमारे पाच लाखांच्या घरात असल्याचे त्या ठिकाणच्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. देशव्यापी लॉकडाउन होण्यापूर्वीच चौपाटी डांबरीकरणाच्या कामासाठी बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. तेव्हापासून आजअखेर ती बंदच आहे.

माण तालुक्‍यात पावसाची विश्रांती, कांदा लागणीस वेग

गेले सात महिने चौपाटी बंद असल्याने येथील व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून पडले आहे. 100 गाडीमालक, त्यांचे कुटुंबिय, स्थानिक तसेच ओडिशा, बिहार आणि नेपाळ येथून पोटापाण्यासाठी आलेल्यांची परवड सध्या सुरू आहे. चौपाटी सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अनेकांनी पर्यायी जागा शोधत तसेच स्वमालकीच्या जागेत आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, त्याठिकाणी मिळणारा प्रतिसाद अत्यंत अल्प आहे. या अल्प प्रतिसादामुळे अडचणीत असणाऱ्या व्यावसायिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडत चालली आहे.

अकरा ऑक्‍सिजन मशिनसह जनता बॅंकेची टीम कार्यरत
 
गल्ला थंड पडत चालल्याने अनेकांनी नाईलाजास्तव गाडीवर काम करणाऱ्या कामगारांचा हिशोब पूर्ण करत त्यांना निरोप दिला आहे. हातावरचा रोजगार हिरावल्याने अनेकांचा दिवस संघर्षातच सुरू होत आहे. रोजगार हिरावलेल्यांपैकी अनेकांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी सुध्दा त्यांना प्रस्थापितांशी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. एक ना अनेक आघाड्यांवरील संकटांना तोंड देत अनेकांचे जीवनगाणे सुरूच आहे. या व इतर अनेक कारणांनी त्रस्त झालेल्या चौपाटीवरील व्यावसायिक आणि कामगारांनी सातारा पालिकेकडे चौपाटी सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वीच्या काळात ऐतिहासिक राजवाड्याच्या सौंदर्यास बाधा येत असल्याच्या कारणास्तव चौपाटीचे स्थलांतर करण्याचा विचार सातारा पालिकेने केला होता.

पुण्याप्रमाणे साता-यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना हवी वेळ

त्यानुसार राजवाडा परिसरातच नव्याने झालेल्या वाहनतळावर चौपाटी सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली होती. याठिकाणची जागा चौपाटीसाठी अपुरी असल्याने नंतर त्याबाबतची कार्यवाही रेंगाळली. याच काळात युनियन क्‍लबच्या मागील जागेत चौपाटीचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, त्यावरील कार्यवाहीसुध्दा थंडावली आहे. 

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी 

प्रशासकीय, शासकीय, अशासकीय, तांत्रिक, अतांत्रिक कारणांमुळे चौपाटी सुरू होण्याच्या हालचाली रखडल्याने याठिकाणच्या व्यावसायिक, कामगारांचे भविष्य अंध:कारमय बनत चालले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी याठिकाणचे व्यावसायिक करत आहेत.

साता-याची चौपाटी अजूनही लॉक! 500 व्यावसायिकांना फटका 

Edited By : Siddharth Latkar

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajwada Chowpaty Street Food Hawkers Demands To Start Business Satara News