ज्यांना 'हिंदुत्व' शब्द लिहिता येत नाही, ते आम्हाला काय शिकवणार; रामराजेंचा भाजपवर घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik Nimbalkar

'भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे.'

ज्यांना 'हिंदुत्व' शब्द लिहिता येत नाही, ते आम्हाला काय शिकवणार; रामराजेंचा भाजपवर घणाघात

उंब्रज (सातारा) : भाजप सरकार (BJP Government) सत्तेचा दुरुपयोग करत असून, प्रशासनावर दबाव टाकून कार्यकर्त्यांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा पद्धतीचं राजकारण मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन ताकद दाखवावी लागेल, असं मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केलं.

उंब्रज (ता. कऱ्हाड) इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, संपतराव जाधव, जयवंतराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. रामराजे म्हणाले, ‘‘ज्यांना हिंदुत्व (Hinduism) शब्द लिहिता येत नाही, ते आम्हाला काय हिंदुत्व शिकविणार आहेत. ज्यांच्याकडे विकासाची राजकीय परंपरा आहे, व्हीजन आहे त्यांच्या पाठीमागे जनता असते.’’

हेही वाचा: Bus Accident : बसमध्ये आगडोंब, प्रवाशांचा होरपळून मृत्यू; नाशकातील दुर्घटनेचे थरकाप उडवणारे Photo

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या टोकावर कोणाची सत्ता आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कुठे आहे याचाही विचार करावा लागेल. शर्यत अजून पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण करायची आहे. शरद पवार यांचे विचार तळागाळात पोचवून तरुणांना एकत्र आणून वैचारिक ताकद निर्माण केली पाहिजे. परंपरेने आपण लढलो, तर उद्याची विधानसभा आपली आहे.’’

हेही वाचा: Women Agniveers : महिला अग्निवीरांचाही भारतीय वायुसेनेत समावेश करणार; विवेक चौधरींची मोठी घोषणा

बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणे हा उद्देश आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा पक्षाला उपयोग होईल. सत्तेत असताना जादा निधी देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ता गेल्यानंतर अनेक विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. बाहेरचे लोक मतदारसंघात येऊन काहीतरी बोलायचे आपण वेगळी काहीतरी करतो, असे दाखवायचे जाती-जातीमध्ये समाजामध्ये भांडण लावायचे काम या सरकारचे आहे.’’ या वेळी शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, प्रशांत यादव, लालासाहेब पवार, ॲड. प्रमोद पुजारी यांचीही भाषणे झाली. ॲड. प्रमोद पुजारी यांनी प्रास्ताविक केले. माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचा: Karnataka : SC/ST आरक्षणाबाबत भाजप सरकारचा मोठा निर्णय; 50 टक्के कोटा मर्यादा रद्द करण्याची शक्यता!