Driving License : वाहन चालविण्याच्‍या आंतरराष्ट्रीय परवान्यांत तिप्पट वाढ

जगभरातील कोरोनाचे संकट मावळल्याने मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्यात कमालीची वाढ झाली आहे.
Driving License
Driving LicenseSakal
Summary

जगभरातील कोरोनाचे संकट मावळल्याने मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्यात कमालीची वाढ झाली आहे.

सातारा - जगभरातील कोरोनाचे संकट मावळल्याने मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्यात कमालीची वाढ झाली आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २०२० व २०२१ या दोन वर्षांत केवळ ५८ परवाने दिले असताना २०२२ या एकाच वर्षात तब्बल १०२ आंतरराष्ट्रीय परवाने काढण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात घट झालेल्या वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्यात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात राहणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तींना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना काढावा लागतो. या परवान्यांसाठी संबंधित अर्जदाराला पुन्हा वाहन चालविण्याची चाचणी अथवा परीक्षा द्यावी लागत नाही. मात्र, त्यांचा सध्याचा वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट आणि व्हिसा याची पडताळणी केली जाते. संबंधित अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून सारथी अंतर्गत अर्ज भरताना संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ही प्रक्रिया झाल्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी परिवहन कार्यालयात जावे लागते.

यामध्ये अर्जदाराच्या पासपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता एकच असावा लागतो. त्यानंतर संबंधित अर्जदाराला एकाच दिवसात आंतराष्ट्रीय परवाना दिला जातो. यासाठी अर्जदाराला ऑनलाइन शुल्क भरावे लागते. २०१८ पूर्वी प्रत्यक्षात कागदपत्रे घेऊन प्रक्रिया करण्यास विलंब लागत होता. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय परवाने रखडले होते. त्यामुळे २०१८ नंतर आंतराष्ट्रीय परवाना काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने परवाना काढण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. कोरोनाच्या काळात परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली होती. या परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यावर झाल्याचे दिसून आले. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परदेशात नोकरी, शिक्षणासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय परवान्यांत वाढ झाल्याचे दिसून येते.

वाहन चालवण्याचे आंतरराष्ट्रीय परवाने

वर्ष ..... परवान्यांची संख्या

२०१९ : ७८

२०२० : २१

२०२१ : ३७

२०२२ : १०२

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील अडीच ते तीन वर्षांत वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, यंदा १०२ आंतरराष्ट्रीय परवाने देण्यात आले आहेत. त्यावरून कोरोनानंतर या परवान्यांत वाढ झाल्याचे दिसून येते.

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

जड वाहने वगळून...

भारताशी करार झालेल्या इतर देशांमध्ये वाहन चालविण्यासाठी चालकास आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाना देण्यात येतो. हा परवाना जड वाहने वगळून इतर वाहनांसाठी दिला जातो. या परवान्याची वैधता एक वर्ष असल्याचे परिवहन विभागाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com