
सातारा : रयत विद्यापीठ जूनपासून सुरू
सातारा - सर्वसामान्य कुटुंबीयांतील विद्यार्थ्यांना कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाची संधी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून, येत्या जून महिन्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (रयत) सुरू होणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज येथे केली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, भगीरथ पाटील, संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला श्री. पवार व इतर मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर श्री. पवार यांच्या हस्ते गृहमंत्री वळसे-पाटील यांना ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’, बीजमाता राहीबाई पोपेरे यांना ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. मानचिन्ह, धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना (मरणोत्तर) जाहीर झालेला ‘डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख व कुटुंबीयांनी स्वीकारला. या वेळी रयत विज्ञानपत्रिकेचे प्रकाशन, देणगीदार, गुणवंत विद्यार्थी, राज्य शिक्षक पुरस्कार, आदर्श महाविद्यालय, कर्मवीर पारितोषिकांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. पवार म्हणाले,‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण व ज्ञानप्राप्तीसाठी खर्ची घातले. सद्य:स्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची वाटचाल सुरू आहे. यंदा भारतातून परदेशात साखर निर्यातीत महाराष्ट्र एक नंबरला आला असून हा शिक्षित वर्ग संस्थेतून शिकल्याने पुढे कारखानदारी उभी राहिली आहे.’’ रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ होण्याची इच्छा कर्मवीर अण्णांची होती. त्यामुळे संस्थेला मोठे स्वरूप देण्यासाठी विद्यापीठ स्थापन केले जाणार असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली असून इतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. वळसे-पाटील म्हणाले, ‘‘कर्मवीर अण्णांच्या आदर्शातून रयत शिक्षण संस्था काम करत आहे. या संस्थेला अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक दिशा मिळाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रयतच्या शाळांमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय उपक्रम राबविले जात आहेत.’’ पुरस्काराची रक्कम व स्वत:कडील काही रक्कम एकत्रित करून २५ लाखांचा निधी संस्थेस देत असल्याची घोषणाही त्यांनी कार्यक्रमस्थळी केली. डॉ. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. डॉ. शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. संजय नागपुरे यांनी आभार मानले.
आज अस्वस्थ झालोय : पवार
रयत शिक्षण संस्थेत कोणतीही अडचण आल्यास (कै.) एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व शंकरराव कोल्हे धावून येत होते. या तीन व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक शिखरे गाठत नावलौकिक वाढविला. गावोगावी रयत व कर्मवीर अण्णांचे विचार मांडणाऱ्या तिघांचेही निधन झाल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याने आज अस्वस्थ वाटतंय, असे सांगत शरद पवार यांचा कंठ दाटून आला.
अशिक्षित महिलेकडून धडे
मला मिळालेला पुरस्कार हा काळ्या मातीचा व सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. सध्याची पिढी केमिकलच्या भाज्या खात असल्याने आयुर्मान कमी झाले आहे. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने देशी भाज्या, जुनं वाण लावून विषमुक्त अन्नापासून मुक्ती घेतली पाहिजे. पुढच्या पिढीचा विचार करून काळ्या मातीचं आरोग्य राखण्यासाठी सेंद्रिय शेती करावी, असे सांगत पुरस्कार्थी राहीबाई पोपेरे यांनी माझं कुठलही शिक्षण नसताना सध्या माझ्याकडे बी.एस्सी. ॲग्रीचे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याचे सांगितले.
पुरस्कार्थींची धावपळ... पोलिसांशी वाद
दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम न झाल्याने आजच्या कार्यक्रमात एकत्रित तीन वर्षांचे पुरस्कार वितरित झाले. त्यामुळे राज्यभरातून पुरस्कार्थी मोठ्या संख्येने आले असतानाही त्यांना बसण्यासाठी व्यासपीठाजवळ केवळ ३० ते ३५ खुर्च्या ठेवल्या होत्या. पुरस्कार्थींची व्यासपीठाजवळ जाण्यासाठी गर्दी झाल्याने पोलिसांनी अडवणूक करण्यास सुरुवात केली. या धावपळीत काही पुरस्कार्थी खालीही पडले, तर काहींनी पोलिसांशी वाद घातला. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता.
Web Title: Rayat Vidhyapith Started From June Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..