माणच्या तहसीलदारपदावर मानेंचेच वर्चस्व, सांगलीच्या सानपांची निराशा

रुपेश कदम
Saturday, 31 October 2020

बाई माने एक सप्टेंबर 2018 रोजी माण तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटात नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया केल्या. कोरोना काळातील कामाबद्दल त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. या पद्धतीने त्यांचे काम सुरू असताना तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची दोन ऑक्‍टोबर रोजी बदली झाली. बदली होऊन त्यांना कुठेही नियुक्ती दिली नव्हती.

दहिवडी (जि. सातारा) : माणच्या तहसीलदारपदी कोण राहणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) यांनी दिलेल्या निर्णयानुसार बाई माने याच माणच्या तहसीलदारपदी कायम राहणार आहेत. चंद्रशेखर सानप यांना पुन्हा सांगलीला परतावे लागणार आहे. 

माने एक सप्टेंबर 2018 रोजी माण तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटात नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया केल्या. कोरोना काळातील कामाबद्दल त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. या पद्धतीने त्यांचे काम सुरू असताना तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची दोन ऑक्‍टोबर रोजी बदली झाली. बदली होऊन त्यांना कुठेही नियुक्ती दिली नव्हती. सांगली जिल्ह्यातील तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची नियुक्ती माणचे तहसीलदार म्हणून करण्यात आली होती. त्यांनी पदभारही स्वीकारला होता. 

हे पण वाचा : कोल्हापूर, अहमदाबाद, बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस गाड्यांना साताऱ्यात 'थांबा' आवश्यक : खासदार पाटील

मात्र, आपल्यावर अन्याय झाला आहे, असे म्हणत तहसीलदार माने यांनी सहा ऑक्‍टोबर रोजी मॅटमध्ये या बदलीला आव्हान दिले. मॅटने अंतरिम आदेश देत तहसीलदार माने यांनीच पदभार स्वीकारण्यास सांगितले होते, तसेच 27 ऑक्‍टोबर ही सुनावणीची तारीख दिली होती. दरम्यानच्या काळात माणमध्ये खुर्चीचा खेळ रंगला होता. 27 तारखेला सुनावणी न होता 29 तारखेला सुनावणी झाली. मॅटने तहसीलदार माने यांच्या बदलीला स्थगिती देऊन त्यांना तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले. चंद्रशेखर सानप यांना पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजे सांगलीला हजर होण्याचे आदेश दिले. 

उदयनराजेंच्या मौनामुळे उत्सुकता ताणली; धक्कातंत्राचा होणार वापर!

माण तहसीलदार म्हणून माझा कार्यकाल पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे मी माझ्या बदलीला मॅटमध्ये आव्हान दिले. माझ्या कामाची दखल घेऊन मला न्याय मिळाला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. 
- बाई माने, तहसीलदार, माण 

प्रशासकीय बदलीने मी माण तहसीलदार म्हणून आलो होतो. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत मी पूर्वीच्या ठिकाणी लवकरच पदभार घेणार आहे. 
- चंद्रशेखर सानप, तहसीलदार, सांगली 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re-appointment Of Bai Mane As Maan Tehsildar Satara News