Satara : पाच नगरपंचायतींसाठी आज फेरआरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission

पाच नगरपंचायतींसाठी आज फेरआरक्षण

कऱ्हाड : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या शुक्रवारी (ता. १२) झालेल्या आरक्षण सोडती त्याच दिवशी सायंकाळी रद्द झाल्या होत्या. त्यांची फेरआरक्षण सोडत उद्या (सोमवारी) होत आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत सूचना प्रसिद्ध केली आहे. लोणंद, कोरेगाव, वडूज, दहिवडी, खंडाळा या नगरपंचायतींचा त्यात समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्या सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत होईल. कोरेगावची सोडत पंचायत समिती मिटिंग हॉलमध्ये, खंडाळा नगरपंचायतीची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात, दहिवडीची सोडत माण तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीत, लोणंदची सोडत नगरपंचायतीच्या सभागृहात, तर वडूजची सोडत पंचायत समिती सभागृहात होईल. १७ सदस्य संख्येसाठी ओबीसी आरक्षणाच्या चार जागा देणे आवश्यक होते. मात्र, त्या पाच दिल्या गेल्याने यापूर्वीची सोडत रद्द करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य शासनाने मागास वर्ग व ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, याप्रमाणे प्रस्तावित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार या आरक्षण सोडती झाल्या. यात मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा विषय नसून ओबीसी आरक्षण देताना २७ टक्केप्रमाणे १७ सदस्यांत पाच सदस्य ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले. त्यात ओबीसी महिलेसाठी तीन, तर ओबीसी खुलासाठी दोन जागा आरक्षित झाल्या आहेत. नगरपालिका अधिनियमामधील तरतुदीचा अवलंब करून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ टक्के या ४.५९ जागा या पाच गृहित धरण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. हा प्रकार लोणंद, कोरेगाव, वडूज, दहिवडी, खंडाळा या नगरपंचायतीत घडला. त्यामुळे अशी चूक झालेल्या नगरपंचायतींची शुक्रवारी झालेली सोडत रद्द करून उद्या फेरसोडत होत आहे.

loading image
go to top