
ज्या पध्दतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धूर सोडून हवेत तिरंगा निर्माण करून सलामी देतात, त्याच पध्दतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली.
लोणंद (जि. सातारा) : लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवणच्या दांडी बीचच्या समुद्रात मध्यभागी जाऊन तीन बोटींच्या मदतीने अंदाजे 400 फूट लांब निसर्गपूरक खाण्याचे रंग व मत्स्य खाद्य वापरून भारताचा तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली.
यापूर्वीही प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटांची भव्य तिरंगा रॅली काढून लोणंदमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. गेल्या वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरेंना आदरांजली वाहिली होती, तर तीन महिन्यांपूर्वी कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा साकारला होता. गेल्या महिन्यात मालवण येथील समुद्रात तारकली येथे 321 फूट तिरंगा फडकविला.
प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ऍडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मिसाळ, राहुल परदेशी व मालवण येथील अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. मालवणमधील दांडी बीचच्या समुद्रामध्ये सुमारे तीन किलोमीटर गेल्यानंतर सुमारे 400 फूट लांब तिरंगा साकारला. त्यासाठी निसर्गपूरक खाण्याचे रंग व मत्स्य खाद्य वापरण्यात आले. या उपक्रमातून सर्वांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळी वेगळी सलामी दिली. या वेळी "भारत माता की जय', "वंदे मातरम्'च्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमून गेला होता. ज्या पध्दतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धूर सोडून हवेत तिरंगा निर्माण करून सलामी देतात, त्याच पध्दतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली.
Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ
गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड
रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा
Edited By : Siddharth Latkar