Satara : झुडपांमुळे अपघातांचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Satara : झुडपांमुळे अपघातांचा धोका

काले : पाचवड फाटा ते मालखेडदरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सेवारस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे वाढल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत रस्ते देखभाल व दुरुस्ती विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी वाहनधारकांतून मागणी होत आहे.

पाचवड फाटा ते मालखेड रस्ता हा नेहमीच वर्दळीचा आहे. या राष्ट्रीय महामार्ग व सेवारस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे वाढली आहेत. महामार्ग व सेवारस्त्यालगत असणाऱ्या झुडपांची कापणी देखभाल विभाग करते. मात्र, यावेळी अजूनही त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. या झाडीझुडपांमुळे मोकाट कुत्री व जनावरे राष्ट्रीय महामार्ग व सेवारस्त्यावर अचानक येत असल्याने वाहनधारक गोंधळून जात आहेत.

त्यामुळे अपघात होत आहेत. पाचवड फाटा ते मालखेडदरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत असणारी आटके, नारायणवाडी, वाठार, रेठरे खुर्दसह इतर अनेक गावांचे दळणवळण याच रस्त्याने होत आहे. त्यामुळे दुचाकीसह अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याबाबत रस्ते देखभाल व दुरुस्ती विभागाने वाढलेली झुडपे काढून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या संबंधित गावांतील ग्रामस्थ करत आहेत.

गळीत हंगाम सुरू, धोका वाढला...

सध्या ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. रस्त्यावर ट्रॅक्टर, ट्रॉलीची वाहतूक वाढली आहे. अनेक ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यात सोडले जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Sataratreeroad accident