जीएसटीबाबत अजित पवारांचे 'ते' वक्तव्य दिशाभूल करणारे  : देवेंद्र फडणवीस

जीएसटीबाबत अजित पवारांचे 'ते' वक्तव्य दिशाभूल करणारे  : देवेंद्र फडणवीस

कऱ्हाड : वस्तू व सेवा करातील (जीएसटी) नुकसान भरपाई मार्चअखेरपर्यंत दिली असून, राज्याला केंद्राने 19 हजार 500 कोटी दिले आहेत. मार्चनंतरचा कर राज्यात, देशात आलाच नाही. त्यामुळे ते देणे कठीण आहे. अशा स्थितीत जीएसटीबद्दल राज्यात सत्तेवरील घटक पक्ष खोटे बोलत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे पत्रकार परिषदेत केली. 

येथील कृष्णा रुग्णालयाची पाहणी श्री. फडणवीस यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, डॉ. सुरेश भोसले, प्रवक्ते शेखर चरेगावकर, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने खोटे पण रेटून बोलण्याची पद्धत अवलंबली आहे, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, वस्तू व सेवा कराबाबत सातत्याने जे काही बोलले जाते आहे, ते निव्वळ दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे त्या योजनेची व योजनेच्या व्यवहाराची पद्धत माहिती नसणारे रोहित पवारही त्यावर बोलत आहेत, त्याचे आश्‍चर्य वाटते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांचेही देणे भागवले आहे. मार्च अखेरपर्यंतचे राज्याला 19 हजार 500 कोटींचे देणे केंद्राने दिले आहे. ज्याची चर्चा आहे, ते देणे मार्चनंतरचे आहे. मार्चनंतर कोरोना, लॉकडाउनची स्थिती देशात आहे. त्यामुळे तो करच आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही त्या देणेबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. एक मोठी योजना हाती घेऊन त्याचा परतावा दिला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

महात्मा फुले जीवनदायिनी योजनेबाबत ते म्हणाले, कोरोनाच्या काळात ज्या रुग्णालयांना या योजना लागू आहेत, त्यांना त्याचा परतावा वेळेत मिळणे गरजेचे आहे. राज्यात सर्वांत उत्कृष्ट काम कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलने केले आहे. त्यांनी एक हजारांवर रुग्णांना बरे केले आहे. महात्मा फुले योजनेचे त्यांना केवळ 55 हजार मिळाले आहेत. कोरोनामध्ये लागणारी रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स खासगी रुग्णालयांना पुरवली जाणार नाहीत, असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याची खात्री करण्याचे काम सुरू आहे. सरकारने तसा निर्णय घेतला असेल तर सामान्यांच्या दृष्टीने तो वाईट निर्णय असेल, असे त्यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com