औंध : आजी- माजी सैनिक संघटनेचा स्टेट बॅंकेस टाळे ठोकण्याचा इशारा

शशिकांत धुमाळ
Sunday, 8 November 2020

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बॅंक म्हणून बिरुदावली लावणाऱ्या स्टेट बॅंकेने लोकांना तत्पर सेवा द्यावी. याबाबत लेखी निवेदनाद्वारे बॅंकेच्या विभागीय कार्यालयाकडे मागणी केली आहे, असे आजी- माजी सैनिक संघटनेचे सचिव मंजर धनाजी आमले यांनी सांगितले.

औंध (जि. सातारा) : भारतीय स्टेट बॅंकेच्या औंध येथील शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, बॅंकेने तातडीने पदे भरावीत, अशी मागणी आजी- माजी सैनिक संघटनेने केली. बॅंक प्रशासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत अन्यथा शाखेला टाळे ठोकावे लागतील, असा इशाराही दिला आहे.
 
संघटनेने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की औंध येथे पूर्वीपासून भारतीय स्टेट बॅंकेची शाखा आहे. परिसरातील पारगाव, कळंबी, वडी, त्रिमली, लांडेवाडी, येळीव, खरशिंगे, गोपूज, वरुड, औंध, खबालवाडी, नांदोशी, गोसाव्याचीवाडी आदी गावांतील आर्थिक व्यवहार बॅंकेशी निगडित आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शनदेखील याच शाखेत होते. त्यामुळे परिसरातील ग्राहकांचा नित्याचा संबंध बॅंकेशी येत असतो.

कॉंग्रेसला संपवू पाहणाऱ्या जातीयवादी भाजपला जनतेनेचं दूर ठेवलं : बाळासाहेब थोरात
 
शेतीविषयक, शैक्षणिक कर्ज, नोकरदार लोकांसाठी वाहन कर्ज आदी, तसेच दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहक बॅंकेत येतात. मात्र, सध्या बॅंकेत शाखाधिकारी आणि कॅशियर अशी दोनच पदे कार्यरत आहेत. इतर पदे रिक्त असल्याने बॅंकेत खाते काढणे, पैशाचा भरणा करणे, पीक कर्ज काढणे, हयातीचे दाखले जमा करणे या कामासाठी तिष्ठत बसावे लागत आहे. काम वेळेत होत नसल्याने बॅंक कर्मचारी आणि ग्राहकांचे वारंवार खटके उडत आहेत, तर अपुरा स्टाफ असल्याने बॅंकेतील अधिकारी ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला ग्राहकांना देत आहेत. बॅंक असताना ग्राहक सेवा केंद्रात आर्थिक भुर्दंड ग्राहकांनी कशासाठी सोसायचा, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

साताऱ्यात खाद्यतेल भडकले; ऐन सणात गरीब, सामान्यांची पंचाईत

दरम्यान, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बॅंक म्हणून बिरुदावली लावणाऱ्या स्टेट बॅंकेने लोकांना तत्पर सेवा द्यावी. याबाबत लेखी निवेदनाद्वारे बॅंकेच्या विभागीय कार्यालयाकडे मागणी केली आहे, असे आजी- माजी सैनिक संघटनेचे सचिव मंजर धनाजी आमले यांनी सांगितले. 

""मागील चार दिवसांपासून स्टेट बॅंकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारले. मात्र, स्वतःचे पैसे खात्यावर शिल्लक असून, ही बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी. याबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.'' 

ज्ञानेश्वर यादव, त्रस्त ग्राहक, भारतीय स्टेट बॅंक, शाखा औंध 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sainik Sanghatana Aggressive On Working Of State Bank Of India Aundh Branch Satara News