फलटण : रणजितसिंहांच्या बळकटीसाठी पदवीधर निवडणूकीत कार्यकर्त्यांनी झटावे

व्यंकटेश देशपांडे 
Sunday, 29 November 2020

या विजयामध्ये फलटण तालुक्‍याचा सिंहाचा वाटा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फलटण (जि. सातारा) :  पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना फलटण शहर व तालुक्‍यातून भरघोस मतदान होईल, यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक काम करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले.
 
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलठण (फलटण) येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस भरत मुळे होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, युवा नेते अभिजित नाईक-निंबाळकर, सुरेश निंबाळकर, जिल्हा सचिव मुक्ती शहा, तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासाहेब इवरे, किसान मोर्चाचे अध्यक्ष धनंजय पवार, शहराध्यक्ष नितीन वाघ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उषा राऊत, कामगार आघाडीचे अध्यक्ष पै. बाळासाहेब काशीद, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सागर अभंग उपस्थित होते.

प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरी जाऊन आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगावी. हा मतदारसंघ पारंपरिक भाजपचा असल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल, यात कसलीही शंका नाही. परंतु, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्‍यामधून जास्तीत जास्त मताधिक्‍य द्यावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
 
जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक 50 मतदारांमागे एक पदाधिकाऱ्याने जबाबदारी घेऊन उमेदवारांचा प्रचार करावा तसेच मतदारांना मतपेटीपर्यंत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे व या विजयामध्ये फलटण तालुक्‍याचा सिंहाचा वाटा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक सचिन अहिवळे यांनी स्वागत केले. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी आभार मानले.

सरकार विरोधात जनतेत चीड : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangramsingh Deshmukh Pune Gradute Election Meeting Satara News