esakal | 'रुग्णांची सेवा करणारे हॉस्पिटल केवळ हॉस्पिटल नसून ते एक पवित्र मंदिर आहे'

बोलून बातमी शोधा

Sanjay Pujari

'रुग्णांची सेवा करणारे हॉस्पिटल केवळ हॉस्पिटल नसून ते एक पवित्र मंदिर आहे'

sakal_logo
By
मुकुंद भट

सातारा : कोरोनाची मनात कोणतीही भीती व काळजी न बाळगता आत्मविश्वास व जिद्दीने सामोरे जाऊन कोरोनावर मात केली. आजार अंगावर न काढता वेळेत औषधोपचार केले. समतोल आहार व व्यायामावर भर दिला. लोकांनी पैशांपेक्षा निकोप आरोग्य व दीर्घायुष्यासाठी अधिक लक्ष द्यावे. 28 मार्चला मला खोकला व पाठदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर खासगी दवाखान्यात छातीचा सिटी स्कॅन केला आणि शरीरात ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्याचे समजले. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 31 मार्चला कृष्णा रुग्णालयात दाखल झाल्याचे डॉ. संजय पुजारी सांगतात.

त्या आधी दोन दिवस पत्नी व दोन मुलींना त्रास होऊ लागल्याने त्यांना घरातच औषधोपचार केले. घरातील कुटुंबीयांची काळजी वाटत असताना सहलीस जाण्याची पूर्वतयारी केल्यासारखी धाडसाने दवाखान्यात जाण्याची तयारी केली. सहकारी प्रमोद व कुमार यांच्यासह हितचिंतक व नातलगांनी मनावरील भीती व काळजी दूर करून धीर व आधार दिला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मला चार दिवस ऑक्‍सिजनवर ठेवले. रेमडेसिव्हिरची सहा इंजेक्‍शन्स दिली. यापूर्वी आयुष्यात मी कधीही इंजेक्‍शन, औषधे घेतलेले नव्हते. या हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात 3 ते 87 वर्षांपर्यंत वयोगटातील 28 कोरोना रुग्ण होते. रुग्ण, डॉक्‍टर्स, नर्सेस हे आपुलकीने एकमेकांची चौकशी व सहकार्य करत होते.

'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

दवाखान्यात रोज वेळेत व गरम जेवण, नाश्‍ता, दूध, अंडी मिळत होती. घरच्यासारखे जेवण मिळत होते. हॉस्पिटलमधील सेवा व स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. त्या काळात हॉस्पिटलमध्येच चालण्याचा व्यायाम केला. 10 एप्रिलला कोरोनायोद्धाचे प्रमाणपत्र देऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दवाखान्यात इंजेक्‍शनखेरीज एक पैसाही घेतला नाही. कोरोनामुक्तीच्या काळात सहकाऱ्यांनी मला जगण्याचा उत्साह व बळ दिले. घरी सुखरूप परत आल्यावर सर्वांना आनंद झाला. त्यानंतर मी पुन्हा उत्साहाने व नव्या दमाने कामास सुरुवात केली. फुफ्फुसाच्या व्यायामासाठी रबरी फुगे फुगवतो व माउथ ऑर्गन वाजवतो. लोकांनी डॉक्‍टरांच्या सेवेवर व विज्ञानावर विश्वास ठेवावा. रुग्णांची सेवा करणारे हॉस्पिटल केवळ हॉस्पिटल नसून ते एक पवित्र मंदिर आहे, असे माझे मत आहे. लोकांनी कोरोनाची भीती न बाळगता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Edited By : Balkrishna Madhale