esakal | 'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

बोलून बातमी शोधा

Vijaya Kanase
'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'
sakal_logo
By
अमोल जाधव

सातारा : कोरोना संसर्गाचा मला त्रास जाणवू लागल्याने कऱ्हाडच्या सिध्दिविनायक हॉस्पिटलला अॅडमिट केले. त्या कालावधीत कोरोनाची मोठी लाट होती. एकीकडे कोरोना संसर्ग व माझ्या आयुष्याने सत्तरी ओलांडलेली, तर दुसरीकडे मला असलेला 20 वर्षांपासूनचा मधुमेहाचा त्रास. या दोन्ही आजारांच्या कात्रीत मी सापडले होते. तोच पतींना पार्ले येथील शासकीय वसतिगृहात होम क्वारंटाइन केले होते. मी ऍडमिट झाले, त्याचदिवशी पुण्यातील भाऊही अॅडमिट होता. याच काळात अनेक अफवाही गावात पसरल्या होत्या. पण, मनामध्ये कोरोनाला हरवायचे आणि सकारात्मक विचाराने या संकटातून बाहेर पडायची खूणगाठ मी बांधली होती.

साडेचार महिने या आजाराभोवती मी शर्थीने लढत होते. दररोज मी कोरोनाला हरवतेय, अशी मनात जिद्द ठेवायचे. माझ्याबरोबर अॅडमिट झालेल्या भावाचे आठवडाभरात निधन झाले. त्यामागोमाग आठ ते दहा दिवसांत दुसऱ्या भावाचेही निधन झाले. या दु:खद घटना घरच्यांनी मला पाच महिन्यांनंतर सांगितल्या. घरच्यांनी मला आजारपणात जितका धीर दिला, तितकाच धीर देत त्यांनी माझे तेही दु:खही हलकं केले. अजूनही मी व माझे पती शेणोलीला घरी गेलेलो नाही. काही दिवसांतच घरी जावून संसाराच्या अडकलेल्या गाडीला स्टार्टर मारणार आहोत. रोग कसा जीव टांगणीला लावतो, हे मी जवळून अनुभवलं. शेणोलीला सकाळी किल्ले मच्छिंद्रगडाच्या बाजूला आम्ही काही महिला एकत्रित व्यायामाला जायचो. व्यायामाहून येताना पावसात मी भिजले व मला कफाचा त्रास झाल्याने सिध्दिविनायक हॉस्पिटलला अॅडमिट केले. तेथून एका दिवसातच मला सह्याद्री हॉस्पिटलला हलवले. तेथे डॉ. महेश देशमुख हे माझ्यासाठी दूत म्हणून उभे राहिले. नातेवाईकांनी मोबाईलवरून संपर्क केल्यामुळे त्यांनी माझी आस्थेवाईकपणे काळजी घेतली. मला डिस्चार्ज मिळाला, तोपर्यंत पतीही ठीक झाले होते. माझी तब्बेत पूर्ण बरी झाल्याने सर्व औषधोपचार बंद केले होते.

दहा दिवसांच्या एकांतवासातून बरंच काही शिकलो अन् कोरोनाला हरवलोच!

निमोनियामुळे फुफ्फसावर इन्फेक्‍शन झाल्याने महिनाभर घरीच ऑक्‍सिजन लावण्याचा डॉक्‍टरांनी घरच्यांना सल्ला दिला. त्यानुसार मी मुले सुधीर व किरण यांच्याकडे पुण्यातील घरी आले. तेथे मुले, सुना व नातवंडांनी माझी खूप काळजी घेतली. एकीकडे कोरोना व दुसरीकडे मधुमेह या दोन्ही आजारांच्या तावडीतून निघताना मला घरच्यांनी दिलेला धीर, सकारात्मक विचारांची दिलेली ताकद खूप उपयोगी ठरली. महिन्याऐवजी 20 दिवसांतच माझा ऑक्‍सिजन काढला. त्यानंतर मी स्वतःची काळजी स्वतः घेतली. दररोज सकाळी हलका व्यायाम, पथ्ये पाळून योग्य आहार घेऊन अंगातील अशक्तपणा कमी केला. अडचणींच्या फेऱ्यातून मी साडेचार महिन्यांनंतर सुटले. केवळ जिद्द, सकारात्मक विचार व घरच्यांचे बळ मला तारण्यास उपयोगी आले. स्वतःमधील आत्मविश्वास सतत जागृत ठेवा, सकारात्मक विचारांची कास सोडू नका, तुम्ही नक्की बरे व्हाल.

Edited By : Balkrishna Madhale