सातारा जिल्ह्यात रोज वाढतोय आकडा; कोरोनाबाधित ५०० पार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५१६ वर गेला असून यापैकी ३०८ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत असून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून १५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आजही रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 33 कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 516 झाली आहे. कोरोनाची साखळी जिल्ह्यात तुटेनाशी झाली आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या साकुर्डी येथील युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
 
दिवसभरात रायगाव (ता. जावळी), खावली (ता.सातारा) येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 11 व कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा 14 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आज 15 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

रायगाव कोरोना सेंटरमधील तीन आणि खावली येथील आठ असे एकूण 11 जणांना घरी सोडण्यात आले. यामध्ये खटाव तालुक्‍यातील मायणी, डिस्कळ येथील प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यातील न्हावी बुद्रुक एक, वारणानगर तीन, शेंद्रेतील एक, खंडाळा तालुक्‍यातील कवठे जवळेतील एक, अजनूज येथील दोन, वाई तालुक्‍यातील आसरे येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेजमधून म्हासोली (ता. कराड) दोन, नांदगाव एक, शामगाव येथील एक युवकाचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
आज दिवसभरात मृत्यू झालेल्या कोरोना संशयितासह क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील तीन, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील पाच, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 77, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 60

तसेच ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील नऊ व रायगाव कोरोना सेंटरमधील 24 असे एकूण 216 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. यामध्ये ग्रामीण रुग्णालय वाई येथे वाई तालुक्‍यातील आंबेदरे, आसरे येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोविड संशयित म्हणून नमुना तपासणीकरिता पुणे येथे पाठविला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले. 

27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
जिल्ह्यातील 27 संशयित रुग्णांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले असून, एका मृत रुग्णासह 216 जणांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 516 झाली असून, यापैकी 308 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara : 32 More corona Infected Patients Found Today In District