मृत बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी 50 वॉरिअर्स

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास संबंधितांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत सात रुग्णांवर व रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या अन्य दोन संशयितांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी एकच पथक होते. मात्र, आता सात वेगवगळ्या पथकांची पालिकेने निर्मिती केली आहे. त्यासाठी सुमारे 50 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती केली आहे. अनुभवी कर्मचारी त्या पथकांवर नियंत्रण करतील, असा आराखडा पालिकेने तयार केला आहे.

कऱ्हाड (जि.सातारा) : कोरोनाचे सावट अधिक गडद होत आहे. त्यामध्ये कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यावर नियंत्रण ठेवताना शासनाला कसरत करावी लागत आहे. मुंबई, पुण्याहून परतलेले नागरिक जास्त प्रमाणात बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. 

सध्या जिल्ह्यात 516 रुग्ण आहेत. आजअखेर तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सात जण कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील होते. त्यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे दोन्ही तालुक्‍यांतील रुग्ण दगावला की, त्यावर कोविडच्या निकषांनुसार तयार केलेल्या खास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी लागणारी तयारी पालिकेने केली आहे. यापूर्वी सात जणांच्या एका पथकावर अंत्यसंस्काराची जबाबदारी होती. मात्र, सध्या त्यामध्ये वाढ केली आहे. पालिकेने त्यासाठी स्वतंत्र सात पथके तयार केली आहेत. त्यात 50 कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. 

पालिकेने केलेल्या आराखड्यानुसार प्रत्येक पेठनिहाय सात कर्मचाऱ्यांचे पथक केले आहे. प्रत्येक पथकाने स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करण्याचा नियम केला आहे. पेठेच्या नावाने ती पथके तयार केली आहेत. त्यामुळे ठराविक अशा काही कर्मचाऱ्यांवर किंवा पथकावर अंत्यसंस्काराची जबाबदारी न देता ती आता विभागून दिली जाणार आहे. स्माशानभूमीत दहन करण्यासह ज्या समाजात दफन केले जाते, त्याची व्यवस्था याच वेगवेगळ्या पथकांद्वारे होणार आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे संबंधित सात पथकांत 50 कर्मचारी असतील. 

एका पथकात सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना पीपीई किट, सॅनिटायझर, ग्लोव्हजसह त्यांच्या सुरक्षेची अन्य सर्व साधने पालिकेने दिली आहेत. त्या त्या वेळी त्यांना ती पोच केली जाणार आहेत. त्यामुळे पालिकेने त्यांच्या सुरक्षेचीही खबरदारी घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 50 Warriors For The Corona Funeral