वाईकरांनी जपले दातृत्‍व अन्‌ पोलिसांनी जाणले कर्तव्‍य...

Satara 66 Days Free Meals For Police From Wai's Ramdoh Aali
Satara 66 Days Free Meals For Police From Wai's Ramdoh Aali

वाई (जि. सातारा) :  येथील रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी लॉकडाउनच्या काळात तब्बल 66 दिवस अथक परिश्रमांतून वाईतील पोलिसांना दुपारचे जेवण मोफत पुरविले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन काळात पोलिसांना रात्रंदिवस रस्त्यारस्त्यांवर उभे राहून स्वतःचा जीव धोक्‍यात घालून जनतेवर नियंत्रण ठेवावे लागत होते. बारा तासांहून अधिक काळ सेवा बजवावी लागत असल्याने त्यांच्या जेवणाची हेळसांड होताना दिसत होती. पोलिसांची भोजनाची ती गरज ओळखून रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानचे कार्यकर्ते अनिल शेंडे, माधव तावरे, मिलिंद पुरोहित, रोहित चंद्रस, योगेश देशपांडे, घनश्‍याम शेंडे, जितेंद्र पाठक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत शहर व परिसरांतील 38 ते 40 पोलिसांना दुपारच्या जेवणाची मोफत सुविधा पुरविली.

हे कार्यकर्ते सकाळी एकत्र जमून रामडोह आळी व गंगापुरीतून सौ. पटवर्धन यांच्याकडून पोळ्या गोळा करीत असत. त्यानंतर महिला कार्यकर्त्या नीला शेंडे, मधुवंती पुरोहित, विशाखा तावरे, रश्‍मी शेवडे, श्रीमती ज्योती कानडे यांनी अनिल शेंडे यांच्या घरी भाजी, चटणी-कोशिंबीर तयार करीत असत. पोळ्या व भाजी, चटणी कोशिंबीर पॅक करून जेवणाच्या पिशव्यांचे बॉक्‍स पोलिस कर्मचाऱ्यांकडे देत असत. नंतर ते पोलिस कर्मचारी ड्यूटीवर असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत हे जेवण दुपारच्या वेळी पोचवत असत. 

रामडोह आळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना स्वयंपाक करण्याची व डबा पोचविण्याची काळजी नव्हती. विशेषतः महिला पोलिसांची चांगली सोय झाली. त्यातच पोलिसांच्या जिल्ह्यामध्ये कोठेही ड्यूटी लावण्यात आल्याने घरांपासून दूर असलेल्या पोलिसांची जेवणाची सोय झाली. या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांनी पदरमोड करून तसेच वाईतील दि वाई अर्बन बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, संचालक प्रा. विष्णू खरे, गिरीश देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, विजयकुमार मुळीक, सुहास पानसे, अविनाश जोशी, मामा वनारसे, हर्षद पटवर्धन, तानाजी काळे, तानाजी गाढवे, अशोक लोखंडे, माधव चौंडे, योगेश चंद्रस, चंद्रकांत कुलकर्णी, अच्योतानी बंधू, विजय लुकतुके, डॉ. विजय तावरे, श्री. दारूवाले आदींनी याकामी आपल्या परिने वस्तूरूपाने व आर्थिक स्वरूपाने मदत केली. एक दिवस भाजी व एक दिवस पुलाव सौ. महाडिक व सौ. भारती निकम यांनी स्वखर्चाने करून दिला. 

दि. 22 मार्चची जनता संचारबंदी व त्या दरम्यान झालेले पोलिसांचे हाल पाहून रामडोह आळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांची सेवा करण्याची इच्छा झाली. या उपक्रमाची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही मान्यता दिली. या कार्यकर्त्यांनी अक्षयतृतीयेला पोलिसांना आम्रखंडाचे मिष्टान्न व 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर गोड शिऱ्याचे जेवण व दररोज पाण्याच्या बाटल्या असे साहित्य मोफत पुरविले. या उपक्रमाच्या समारोपासाठी पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक कांबळे, पोलिस कर्मचारी भोसले, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम व प्रमुख अधिकारी रामडोह आळीत उपस्थित राहिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com